बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ पत्रातील मजकूर!
सलीम खान सकाळी फिरण्यासाठी गेले होते. तिथे ते एका बाकावर बसले असताना त्यांना हे पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सलमान खानला आलेल्या या धमकीनंतर खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मनोरंज सृष्टीत सध्या भीतीचं सावट असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबी रॅपर सिध्दू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. पंजाब सरकारने मूसेवालाची सुरक्षा कमी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.