अभिनेत्री समंथाला झालाय मायोसिटिस आजार. हा आजार नेमका कोणता, जाणून घ्या.

बहुतांश चाहत्यांची आवडती अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने रविवारी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला. समंथाने रुग्णालयातील तिचा पाठमोरा फोटो पोस्ट करत तिला झालेल्या आजाराची माहिती या पोस्टमधून दिली होती. ‘मायोसिटिस’ या दुर्मिळ आजाराने समंथाला ग्रासलं आहे. या ऑटोइम्युन हेल्थ कंडिशनवर मात करण्यासाठी समंथा सध्या परदेशी उपचार घेत आहे. या पोस्टवर अनेकांनी समंथाच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. तर अनेकांना हा आजार नेमका काय आहे, असा प्रश्नही पडला. मायोसिटिस या आजाराविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

 

मायोसिटिस रोग काय आहे ? 

 

बहुतांश लोकांनी हा आजार कदाचीत पहिल्यांदाच ऐकला असेल, खरंतर मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये जळजळ होते. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात. मारेंगो क्यूआरजी रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संतोष कुमार म्हणतात, “मायोसिटिस ही एक अशी स्थिती आहे, ज्यामुळे रुग्णाच्या स्नायूंवर त्याच्याच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो.”

 

यात सहसा हात, खांदे, पाय, पार्श्वभाग, पोट आणि पाठीच्या स्नायूंवर परिणाम होतो. आजार आणखी बळावला असेल तर त्याचा अन्ननलिका, डायफ्राम आणि डोळ्यांच्या स्नायूंवरदेखील परिणाम होऊ शकतो. अशा रुग्णांना बसल्यानंतर उभं राहताना, पायऱ्या चढताना, वस्तू उचलतानाही सहत्रा त्रास होतो. असं ते पुढे म्हणाले.

 

मायोसिटिसची रोगाची लक्षणं 

 

या आगळ्यावेगळ्या मायोसिटिस आजारामध्ये सर्वसामान्यपणे स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवतात. स्नायूंचं दुखणं आणि दैनंदिन जीवनातील कामं करण्यात अडचण अशी लक्षणं असतात. हलका ताप, पुरळ आणि सांधेदुखी ही सुद्धा सामान्य लक्षणं असू शकतात.

तज्ञांच्या मते, या आजाराच्या इतर लक्षणांमध्ये ताप, वजन कमी होणं, सांधेदुखी, थकवा आणि स्नायू दुखणं यांचाही समावेश होतो.

 

निदान आणि उपचार कसे करावे ?

 

काही तज्ञांच्या मते, या आजाराचं निदान सामान्यपणे क्लिनिकल तपासणी, रक्ताचं कार्य, एमआर इमेजिंग, ईएमजी आणि मसल बायोप्सीनंतर केलं जातं. त्यावर स्टेरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसिव्ह औषधांनी उपचार केले जातात. तज्ञांच्या मते, “जर या आजाराचं कारण व्हायरल इन्फेक्शन असेल तर ते स्वत:च्या रोगप्रतिकारक क्षमतेवर अवलंबून असतं. जर औषधांमुळे झालं असेल तर औषध बंद केल्यावर ते बरं होऊ शकतं. पण याचं सर्वसामान्य कारण हे स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती असते. शरीरातील अँटिबॉडीज जे स्नायूंच्या पेशींना लक्ष्य करतात आणि त्यामुळे जळजळ म्हणजेच वेदना, अशक्तपणा जाणवू लागतो.”

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts