पुन्हा लॉकडाउन होणार ? काही जिल्ह्यात लॉकडाउन  ची परिस्थिती !

राज्यात पुन्हा काही जिल्ह्यात लॉकडाउन  ची परिस्थिती

राज्यातील कोरोना व्हायरसच्या साथीने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्याच्या ग्रामीण भागांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
गर्दीच्या महानगरांसोबतच लहान शहरं आणि जिल्ह्यांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.




कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आरोग्य प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबत बैठकांचं सत्र सर्वच ठिकाणी सुरू झाल्याचं सध्या चित्र आहे.
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या शहरांमध्ये काय परिस्थिती आहे, त्याची माहिती आपण घेऊ.

 

1. मुंबई

मुंबईत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर पहिल्याच आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं दिसून आलं
आले होते. पण 2 फेब्रुवारीला 334 तर 3 फेब्रुवारी रोजी 503 नवे रुग्ण सापडले. 10 फेब्रुवारी रोजीही 558 नवे रुग्ण आढळले. अशा प्रकारे गेल्या 10 दिवसांत 4237 रुग्ण सापडले असून त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये पुन्हा पूर्वीसारखी गर्दी दिसू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, चर्चगेट यांसारख्या स्थानकांवर पुन्हा प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने इमारती सील करण्यास सुरूवात केलीये.
त्याचसोबत, लोकांच्या बेशिस्त वर्तनाला आळा बसावा, यासाठी इमारतींना नोटीस बजावणं सुरू केलंय.
मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, “वॉर्डमधील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहून स्थानिक पातळीवर इमारतींना नोटीस देण्यात येत आहेत.”



एम-पश्चिम वॉर्डमधील मैत्री-पार्क इमारतीला पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. एम-पश्चिम वॉर्डमध्ये गेल्या काही दिवसात सर्वांत जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
मुंबईत टी वॉर्डमध्ये सर्वात जास्त 180 इमारती, तर एन-वॉर्डमध्ये 139 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
मुंबईत जारी करण्यात आलेल्या सूचना

• सोसायटीत घरकाम आणि दूध देण्यासाठी कमीतकमी लोक येतील याची नोंद घ्यावी.
• थर्मल स्क्रिनिंग करावं.
• कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांनी 14 दिवस क्वॉरेंन्टाईन रहावं.
• हाय रिस्क कॉन्टॅक्टची टेस्ट करावी.

2. पुणे

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही पुणे शहराच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला आणि काही सूचना नागरिकांना दिल्या आहेत.
“मागील आठवड्यात असणारा कोरोनाचा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हिटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात पुन्हा संसर्ग वाढत चालल्याचं दिसून येत आहे.

संसर्ग वाढला तर पुन्हा कंटेनमेंट झोन सुरू करण्याचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर आज तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.” ते म्हणाले, “संसर्ग वाढत असलेल्या चार वॉर्ड ऑफिस परिसरात नव्याने स्वॅब कलेक्शन सेंटर सुरु केली जात आहेत. आरोग्य विभागाला पुन्हा अतिरिक्त मनुष्यबळ पुरवलं जाणार आहे.सर्व प्रकारचे 1 हजार 163 शासकीय बेड्स सज्ज आहेत. खासगी रुग्णालयांना कोरोनाचे अतिरिक्त बेड्स उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. मास्कसंदर्भातील कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे. तसंच महापालिकेने नव्याने अँटिजेन टेस्ट किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.”

3. अमरावती

मुंबई, पुणे या महानगरांप्रमाणेच विदर्भातील अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली. याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणं ही कोरोना हॉटस्पॉट ठरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
शहरात राजापेठ, साईनगर, बेलपुरा, कॅम्प, रुक्मिणी नगर यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रशासनाने कारवाई करणं सुरू केलं आहे.



या भागात प्रशासन घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. 15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते. पण, खबरदारी म्हणून अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये उघडण्याची तारीख लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील महाविद्यालये 2 आठवडे उशिराने उघडणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय.

4. वर्धा

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अमरावती, अकोला पाठोपाठ वर्धा जिल्ह्यातही जमावबंदीचे आदेश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 85 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी म्हणून जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10,916 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या असून त्यात 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


वर्ध्यात 13 फेब्रुवारीला 113 तर आज 85 कोव्हिड रुग्णांची भर पडली. गेल्या आठवभरापासून 50च्या वर कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी जमावाने एकत्र येऊ नये तसंच धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलनं, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका, लग्नसमारंभ इत्यादी कार्यक्रमांवर करीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थितीची अट घालण्यात आली आहे.

5. वाशिम

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात 17 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.या आदेशानुसार शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.


सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलनं, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका याठिकाणी केवळ 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत मिरवणूक आणि रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

लग्न समारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तसंच ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त संख्येने समारंभासाठी व्यक्ती उपस्थित राहिल्याचे निदर्शनास आल्यास मंगल कार्यालय चालकाविरुद्ध पहिल्या वेळी 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, दुसऱ्या वेळी अशीच बाब निदर्शनास आल्यास ते मंगल कार्यालय 15 दिवस बंद करण्यात येईल, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts