अपचन किंवा अजीर्ण झाल्यावर ढेकर येणं वा पादणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ही क्रिया कोणत्याही वयोगटातील व्यक्तींला सहज होऊ शकते. परंतु, चारचौघांमध्ये फार्ट केल्यावर म्हणजे पादल्यावर अनेकांना ओशाळल्यागत होतं आणि ते स्वाभाविक आहे. खरंतर रस्त्यावरुन जातांना किंवा एखाद्या कार्यक्रमात अचानकपणे कोणीतरी पादल्याच्या अनेक घटना आपल्या आजुबाजूला घडत असतात. या घटनांकडे आपण दुर्लक्षदेखील करतो. मात्र, एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी पादणं चांगलंच महागात पडलं आहे.
पोलिसांसमोर पादल्यामुळे या व्यक्तीला चक्क न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. ऑस्ट्रियामध्ये एक व्यक्ती पोलिसांसमोर पादल्यामुळे त्याला तब्बल ४४ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.मात्र, संबंधित व्यक्तीने न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्याच्या दंडाची रक्कम कमी करुन त्याला ९ हजारांचा दंड भरावा लागला आहे.
सध्या चर्चेत आलेली ही घटना असून एक व्यक्ती त्याच्या मित्रासोबत व्हिएन्नामधील एका पार्कमध्ये बसला होता. त्याचवेळी पोलिस अधिकारी त्यांच्या रुटीन चेकअपसाठी या पार्कमध्ये आले होते. विशेष म्हणजे पोलिस बोलत असतांना हा इसम मुद्दाम त्यांच्यासमोर पादला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हणत पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. संबंधित व्यक्तीला प्रथम ५०० युरो म्हणजे तब्बल ४४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, या व्यक्तीने न्यायलयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने दंडाची रक्कम कमी करुन १०० युरो म्हणजे ८ हजार ८९२ रुपये केली आहे.