कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यात एका आठवड्याचं लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली.
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यात जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला.
हे लॉकडाऊन जिल्ह्यात अमरावती शहर आणि अचलपूर या ठिकाणी लावण्यात आलं आहे.
इतर ग्रामीण भागात लॉकडाऊन लावण्याची गरज भासल्यास तो सुद्धा लावण्यात येईल असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय.
तत्पूर्वी, महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील संचारबंदीचा आढावा घेतला.
अमरावती जिल्हात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदी तसेच विकेंडला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (21 फेब्रुवारी) घेतला.
शहराच्या विविध भागात त्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वाढती रुग्णसंख्या ही धोक्याची घंटा आहे, नागरिकांनी सहकार्य करायला पाहिजे अन्यथा लॉकडाऊन शिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही,असे त्या म्हणाल्या.