दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी, आशा पारेखजी.

आशा पारेख हे नाव घेतलं की डोळ्यापुढे एक सुंदरशी बाहुली आणि ओठांवर गाणी अनावधानाने बाहेर पडतात. ‘साथीया नहीं जाना कि जिना पडे’, ‘अच्छा तो हम चलते है’, ‘तेरे कारन मेरे साजन’, ‘ओ मेरे सोना रे सोना’, ‘कितना प्यारा वादा है’, ‘तेरी आखों के सिवा दुनिया में’, ‘तुम मुझे यु भुला ना पाओगे’ अश्या आणि बऱ्याच त्यांच्या अभिनयातून गेलेल्या गण्यांची एका मागून एक जणु लिस्टच लागेल. खरंतर हिंदी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना ओळखलं जातं. सिनेसृष्टीत त्यांचं मोठं योगदान आहे. म्हणूनच आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आशा पारेख यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती.

 

खरंतर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आशा पारेख यांनी ७५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. लवकरच होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आशा पारेख यांना हा सन्मान दिला जाणार आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आशा पारेख यांना पुरस्कार दिला जाणार आहे. आशा पारेख यांची या पुरस्कारासाठी निवड झाली हे अभिमानास्पद असल्याचं मत अनुराग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. येत्या ३० सप्टेंबरला दिल्लीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

 

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी बेबी आशा पारेख या नावाने आपलं करिअर सुरु केलं होतं. अवघ्या दहा वर्षांच्या असताना दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना एका स्टेज शोमध्ये पाहिलं होतं. चिमुकल्या आशाला पाहून ते फारच प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला ‘माँ’ या चित्रपटात एक बालकलाकार म्हणून संधी दिली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बेबी आशा पारेख म्हणून काम केलं आहे. त्यानंतर १९५९ मध्ये नासिर हुसैन दिग्दर्शित ‘दिल देके देखो’ या चित्रपटातून एक अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत सुपरस्टार शम्मी कपूरदेखील होते. हा चित्रपट तुफान गाजला होता. या आपल्या पहिल्याच चित्रपटात आशा पारेख यांना मोठं स्टारडम मिळालं होतं. या चित्रपटानंतर आशा पारेख आणि नासिर हुसैन यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले होते ते आयुष्यभर टिकले. 

 

आशा पारेख यांना मनोरंजन क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. १९९२ मध्ये भारत सरकारने त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. आशा पारेख १९९८ ते २००१ या काळात सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही होत्या.

 

आशा पारेख यांनी जब प्यार किसीसे होता है, तिसरी मंजिल, कटी पतंग, बहारों के सपने, फिर वही दिल लाया हूँ, कारवाँ, मंजिल-मंजिल,दो बदन अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या एक उत्कृष्ट नृत्यांगनाही आहेत. आशा पारेख यांनी फक्त अभिनेत्रीच नव्हे तर एक दिग्दर्शिका आणि निर्मात्या म्हणूनही काम केलं आहे.

 

अभिनयातून गाजलेली गाणी

 

आशा पारेख यांनी अनेक चित्रपटात काम तर केलंय मात्र त्या चित्रपटासोबत काही गाणी फारच ऐकल्या गेली आणि आजही ऐकविशी वाटतात आणि ती म्हणजे, साथीया नहीं जाना कि जिना पडे, अच्छा तो हम चलते है, तेरे कारन मेरे साजन, ओ मेरे सोना रे सोना, कितना प्यारा वादा है, तेरी आखों के सिवा दुनिया में, तुम मुझे यु भुला ना पाओगे अश्या आणि कित्येक गाजलेल्या गाण्यातून त्यांनी अभिनेत्री म्हणून रसिकांच्या मनावर छाप सोडली. मात्र आजही त्यांनी अभिनय केलेल्या गाण्यांना श्रोत्यांची तेवढीच पसंती मिळते हे केवळ गॉड गिफ्टच म्हणावं लागेल. येत्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आशा पारेख यांच्या चाहत्यांसाठी तर पर्वणीच आहे. चला तर आशा पारेख यांच्या पुढील वाटचालीसाठी आपणदेखील त्यांना भरभरून शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुषी स्वस्थ जीवनास मंगल कामना करूयात.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts