राज्यात लॉकडाऊन, परंतु मनोरंजनाचा प्रवाह सुरू कसा?

देशामध्ये पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लागू झाला आहे. मनोरंजन सृष्टीचा विचार केला तर सिनेमा, मालिकांचे चित्रिकरणही थांबले आहे. त्यामुळे नवीन भाग प्रेक्षकांना पाहणे मुश्किल झाले आहे. गेल्यावर्षीचीच ही पुनरावृत्ती होत असल्याने वाहिन्यांनी त्यांच्या मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यांमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात ‘झी मराठी’ ने केली आहे. या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या बऱ्याच मालिका आता राज्याबाहेर जाऊन चित्रीत केल्या जात आहेत.

महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर.’ गेल्याही वर्षी करोनाच्या काळात हा कार्यक्रम ऑनलाइन माध्यमातून होत होता. आता देखील अशाच पद्धतीने हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या लॉकडाउनमध्येही घराघरातील वहिनींना भावोजींकडून पैठणी मिळण्याची संधी आहे. ‘घरच्या घरी’ या विशेष सेगमेंटमध्ये आदेश बांदेकर व्हिडीओ कॉलद्वारे प्रेक्षकांशी संपर्क साधणार आहेत. ‘वर्फ फ्रॉम होम’ या प्रकारात कार्यक्रमाचे शूटिंग सुरू झाले आहे.

झी मराठीवरील आणखी एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला.’ या मालिकेतील ओम आणि स्वीटूच्या जोडीने घराघरातून प्रेम मिळवले आहे. या मालिकेतील पुढील भागांचे चित्रीकरण दमणमध्ये होणार आहे. या मालिकेतील सर्व कलाकार दमणमध्ये गेले आहेत.

‘पाहिले न मी तुला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. शशांक केतकर, तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत पुढील भागांचं चित्रीकरण गोव्यात करणार आहेत.

झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय ठरलेली मालिका अर्थात ‘माझा होशील ना.’ या मालिकेतील सई- आदित्यच्या जीवनात दररोज काही ना काही घडामोडी घडत असून ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेतील पुढील भागांचे चित्रीकरण सिल्वासामध्ये होणार असून सर्व कलाकार तिथे दाखल झाले आहेत.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचा नवा सीजन असलेली मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सूनबाई’. या मालिकेत पुढील भागांचे चित्रीकरण गोव्यात होणार आहे.

‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचे नवे भाग देखील तयार आहेत. या मालिकेचे चित्रीकरण पहिल्यापासूनच मुंबईच्या बाहेर होत असल्याने त्याच्या प्रसारणात कोणताही व्यत्यय आलेला नाही.

गेल्या सहा वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या मालिकेचे संपूर्ण शूटिंग जयपूर येथे करण्याचा निर्णय झी मराठी वाहिनीने घेतला आहे.

चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱ्या वृत्तीवर भाष्य करणारी मालिका अर्थात ‘देवमाणूस.’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या पुढच्या भागाचे चित्रीकरण बेळगाव येथे केले जाणार आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts