गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप तसंच अन्य मेसेजिंगच्याअॅपवर हा आणि अशा स्वरुपाचे मेसेज फिरू लागले आहेत.सोशल मीडियावर फिरणारा हा मेसेज वाचा – “एक तारखेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या सगळ्यांसाठी लसीकरण सुरू होत आहे. लसीकरणासाठी नोंदणी करताना मासिक पाळी कधी येते आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नका. कारण मासिक पाळीदरम्यान आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. लशीचा पहिला डोस आपली रोगप्रतिकार क्षमता कमी करतो आणि मग हळूहळू रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान लस घेतली तर कोरोना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे मासिक पाळी काळात लस घेऊ नका.”
नव्या धोरणानुसार आता १८ते ४५ वयोगटातील स्त्री पुरुषांना लस घेता येणार आहे. या निर्णयाच्या घोषणेनंतर मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नका असं सांगणारे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले.
लसीकरणाचा मासिक पाळीवर परिणाम होतो का?
किंवा मासिक पाळीदरम्यान रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने लस घेऊ नये असं खरंच तज्ज्ञांचं म्हणणं आहे का यासंदर्भात आम्ही डॉक्टर यांच्याशी बोललो.
डॉक्टर सांगतात, “मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणताही अडथळा असू नये. तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळाली असेल तेव्हा जरूर लस घ्या. तरुण मुली कामानिमित्ताने घराबाहेर पडत असतील कारण सगळ्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नसतं. अत्यावश्यक सेवेत अनेक महिला काम करतात. त्यांची मासिक पाळी केव्हाही सुरू असू शकते किंवा नसू शकते. त्यांची नोंदणी झाली असेल आणि लस मिळत असेल तर त्यांनी जरूर लस घ्यावी.”
लशीने तुमच्या शरीराला अपाय होण्याची भीती नाही.
कोरोना आणि मासिक पाळीचा संबंध आहे?
तज्ज्ञ सांगतात, कोरोनाचा मासिक पाळीवर थेट परिणाम झाल्याचा ठोस पुरावा नाही.
हिरानंदानी रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजिरी मेहता म्हणतात, “मासिक पाळीत झालेल्या बदलाचा थेट कोव्हिड-19 शी संबंध लावता येणार नाही. कोरोना संसर्गाचा मासिक पाळीवर परिणाम होतो हे दाखवणारा पुरावा अजूनही उपलब्ध नाही.”
भारत सरकारनं काय स्पष्टीकरण दिलंय?
सोशल मीडियावर मासिक पाळी आणि लसीकरणासंदर्भात मेसेज फिरू लागल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने यासंदर्भात फॅक्ट चेक जारी केलं. त्यात असं म्हटलं आहे की, मुलींनी तसंच महिलांनी मासिक पाळीच्या आधी पाच दिवस आणि नंतर पाच दिवस लस घेऊ नये असे मेसेज फिरत आहेत. ते मेसेजफेक आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका.
१८ वर्षांवरील सगळ्यांसाठी लसीकरण मोहीम १ मे पासून सुरू होत आहे. त्याकरता 28 एप्रिलपासून cowin.gov.in यावर नोंदणी सुरू होत आहे. तर न घाबरता महिलांनो लस घ्या, आपल्या आरोग्याचे जातन करा. सकस आहार घ्या आणि कोरोना लढ्यात लस घेऊन देशाला योगदान द्या.