उन्ह्याळ्यात ही फळं खाणे ठरतात फायदेशीर.

उन्हाळ्यात उन्हामुळे तसेच गर्मीमुळे आपल्याला सतत तहान लागते. उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर आपल्याला अशक्तपणा आल्यासारखा वाटतो. तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहावे, यासाठी उन्हाळ्यात फळांचे सेवन करणेही आवश्यक असते. उन्हाळ्यात मिळणारी काही फळं तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दुर करतात. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन करणं आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरतं. उन्हाळ्यात थंड वाटण्यासाठी अनेकदा कोल्ड्रिंक्सचे सेवन केले जाते. परंतु, रसायने युक्त असणारी ही कोल्ड्रिक्स तात्पुरती बरी वाटत असली, तरी ती शरीराला त्रासदायक आहेत. त्यापेक्षा नैसर्गिक फळे किंवा त्यांचा रस पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळ खाल्ल्याने उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहते. आज आपण या लेखातुन उन्हाळ्यात कोणती फळं खावीत याविषयी हे जाणून घेणार आहोत.

 

कलिंगड (Watermelon)

कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा मोह होत नाही, अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. या फळामध्ये 90% पाणी असते. शरीरातील उष्णता नैसर्गिक पद्धतीने कमी करण्यास कलिंगड खाणं महत्त्वाचं ठरतं. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. याशिवाय कलिंगडाचे सेवन केल्याने पोटातील टॉक्झिक युरिनवाटे बाहेर पडण्यास मदत होते. कलिंगडाचे सेवन केल्याने त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. त्यामुळे हे उपयुक्त कलिंगड उन्हाळयात आपल्या शरीरातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते.

 

खरबूज (Musk melon)

खरबूज या फळात मोठ्याप्रमाणात पाण्याचे प्रमाण असते. खरबूजाची चव कलिंगडापेक्षा फारच वेगळी असते. याचा गर पिवळ्या रंगाचा असतो. उन्हाळ्यात खरबूजाचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच त्वचेचे आरोग्य चांगले राहते. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी खरबूजाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. खरबूज हे फळ आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे उन्हाळ्यात या फळाला देखील जास्त मागणी असते.

 

द्राक्षे (Grapes)

काळी आणि हिरवट, पिवळसर दिसणारी आंबट गोड फळं म्हणजे द्राक्ष. द्राक्षांमध्ये पोटॅशिअम आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. या फळामध्येदेखील मोठ्या प्रमाणात पाणी असते. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ह्रदयविकारांसारख्या समस्यांवर आराम मिळतो. याशिवाय मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचं काम द्राक्ष करतात.

 

पेरू (Guava)

उन्हाळ्यात मिळणारं आणखी एक पाणीदार फळ म्हणजे पेरू. या फळाचा आकार लहान असला तरी त्यात भरपूर पाणी असते. बाजारात फिक्कट हिरव्या रंगाची फळे मिळतात. तसेच अनेक ठिकणी यांचा रंग गुलाबी असतो. या फळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. तसेच मुखरोगांवर उपाय म्हणून पेरू देखील आरोग्यासाठी उत्तम आहे.

 

आंबा (Mango)

उन्हाळ्यात येणारे सर्वात लोकप्रिय फळ म्हणजे आंबा. “फळांचा राजा’ ही उपाधी लाभलेल्या या फळामुळे उन्हाळा सुसह्य तर होतोच, शिवाय उन्हाळ्यातील उष्णता आंबा पचविण्यास मदत करते. पिकलेला आंबा तास-दोन तास साध्या पाण्यात बुडवून ठेवावा व नंतर त्याचा रस काढून, दोन चमचे साजूक तूप, एक-दोन चिमूट मिऱ्याची पूड, सुंठीचे चूर्ण टाकून दुपारच्या जेवणात घ्यावा. आंबा हा आपल्या आरोग्यासाठी उत्तम असून अतिसार, रक्तदोष आणि कफ पित्त दूर करणारा फळ आहे. 

 

डाळिंब (Pomegranate)

उन्हाळ्यामध्ये मिळणारे अजून एक फळ म्हणजे डाळिंब. गोड चवीचे डाळिंब पित्तशामक असते. उन्हाळ्यात गोड डाळिंबाचा रस तृप्तिकर तर असतोच, पण उष्णतेचे निवारण करण्यासाठीही उत्तम असतो. उन्हामुळे पित्त वाढून डोके दुखत असल्यास, मळमळत असल्यास, खडीसाखर घातलेला डाळिंबाचा रस घोट घोट घेतल्यास फायदा होतो. तसेच तहान फार लागत असल्यास व लघवी उष्ण होत असल्यासही डाळिंबाचा रस थोडा थोडा घेण्याने देखील फायदा होतो.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts