हरितालिकेला करा अशी पूजा. साक्षात लक्ष्मीचे घरी आगमन होईल.

हिंदू धर्मांतील अनेक व्रतांपैकी हरितालिका हे महत्त्वाचे व्रत आहे. यास हरतालका किंवा हरितालिका या दोन्ही नावांनी संबोधतात कारण ही दोन्ही नावे ग्रंथात आढळतात. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात. अनेक राज्यांमध्ये याला तीज असंही म्हणतात. हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार कुमारी कन्या हे व्रत चांगला मनासारखा पती मिळण्यासाठी करतात. तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं, यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात. हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती. गुरुवारी ९ सप्टेंबरला महाराष्ट्रभरात हरतालिकेची पूजा केली जाणार आहे. तर मग जाणून घ्या हरतालिका पूजा साहित्य आणि हरतालिका व्रत कसे करावे ते…

 

हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य

 

 

हरतालिकेच्या पूजेसाठी रेती, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, वस्त्र, तसंच १६ प्रकारच्या पत्री (१६ झाडांची १६-१६ पानं), पूजेसाठी फुलं, तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी. चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इत्यादी.

पूजा कशी करावी ?

 

सर्वप्रथम देवी पार्वती, भगवान शिव आणि गणेशजी यांच्या मूर्ती काळ्या ओल्या मातीपासून तयार करा आणि फुलांनी सजवा. या मूर्ती काही काळ सुकू द्या. मुर्ती नसतील तर वाळूचे शिवलिंग बनवा. चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा. पिवळ्या कापडावर तीन मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग असावे. त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा. आता कलश वर स्वस्तिक बनवा आणि कलश मध्ये पाणी भरा आणि त्यात सुपारी, नाणे आणि हळद घाला. मूर्तींचा विधीवत अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. हरतालिका व्रतादरम्यान १६ श्रृंगाराचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी स्त्रिया हातावर मेंहेदीही लावतात, जी सौभाग्याची निशाणी मानली जाते. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.

 दिवसभर कडक उपवास करावा. 

 

हरतालिका व्रताचे महत्त्व काय ?

 

हरितालिकेचे व्रत हे सगळयात आधी देवी पार्वतीने महादेवांसाठी केले होते म्हणून हे व्रत अत्यंत खास व्रत मानले जाते. जी स्त्री हे व्रत करत असते तिच्यावर शंकर पार्वतीची विशेष कृपा दृष्टी असते, असे देखील ह्या व्रताबद्दल सांगितले जाते. 

अनेक जण बाजारात उपलब्ध असलेले मातीच्या गौरी-पार्वतीची मूर्ती आणून त्याचीही पूजा करतात. प्रत्येक विभागातील एक वेगवेगळी पद्धत असली तरी पूजेची पद्धत मात्र एकच आहे. पूजेत सौभाग्याचं लेणं देवी पार्वती/गौरीला अर्पण करावं आणि देवीकडे आपल्या अखंड सौभाग्याची आणि मुलांच्या रक्षणाचा आशीर्वाद मागावा.

 

या व्रतातून काय संदेश मिळतो ?

 

पार्वतीस विष्णूचे स्थळ आले होते परंतू तिने मनोमन वरले होते सांबसदाशिवास, ज्याच्याजवळ भौतिक सुख,ऐश्वर्य नव्हते तरी ती भोलेनाथांच्या गुणांवर भाळली तशीच हल्लीच्या नवीन पिढीतील मुलींनी नवरा निवडताना त्याच्याकडील पैसा,ऐश्वर्य पहाण्यापेक्षा त्याच्या अंगी असलेले गुण, त्याचे स्वत:चे कर्तुत्व, जिद्द ,चिकाटी पहावी असा संदेशच जणू देवी हरितालिका देते.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts