धनत्रयोदशीचे खास महत्व जाणून घ्या. आणि करा ‘याप्रमाणे’ पूजा.

दिवाळी म्हटलं की सणासुदीची लगबग. भरपुर शॉपिंग, फराळ. खरंतर आपण दिवाळीतील अनेक सण समारंभ मोठ्या उत्साहाने पार पाडत असतो. दरवर्षीप्रमाणे धनत्रयोदशी (Dhantrayodashi) दिवसापासून दिवाळी सण सुरू होत असतो. धनत्रयोदशीला (Dhantrayodashi) यम दीपदान केले जाते. विविध प्रथा परंपरा जपत वेगवेगळ्या पद्धतीने धनत्रयोदशी साजरी केली जाते. काही लोकं या दिवशी स्टेनलेस स्टीलची भांडी, सोने, चांदीची आभूषणे व इतर नव्या गोष्टी खरेदी करत असतात. धनत्रयोदशी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी पूजा का केली जाते, कशा पद्धतीने पूजा केली जाते किंवा दीपदान कशाला म्हणतात या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत मग चला तर सुरुवात करूयात धनत्रयोदशीच्या या खास दिवसाला करावयाच्या गोष्टी.

 

दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशी(Dhantrayodashi), नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं.

 

कापणीचा हंगाम ओसरत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खळ्यात धान्याच्या राशी असतात. मात्र, यंदा पाऊस काळ वाढल्याने हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे. तर दिवाळी लग्न सोहळ्यासाठी सोनं खरेदी करण्यासाठी सराफांकडे महिलांची लगबग असते. दिवाळीच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांकडे गर्दी होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी धान्य हे धन तर व्यापाऱ्यांकडे येणारं धन अशा दोन्ही अर्थानं या धनाची पूजा या दिवशी केली जाते.

 

धनत्रयोदशी साजरी करण्याची प्रथा ही धन्वंतरीच्या स्मृतीप्रत्यर्थ सुरू झाली असंही सांगितलं जातं. या दिवशी नैवेद्य म्हणून धणे आणि गुळ ठेवला जातो. यासोबत गूळ, खोबरं, पुरणपोळी किंवा गोडधोड नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे. दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. तर आयुर्वेदात या दिवशी धन्वंतरीची पुजा केली जाते. औषधी वनस्पती लावल्या जातात. या दिवशी झेंडु आणि शेवताच्या फुलांचा बहर किंवा हंगाम असल्यानं या दिवशी या फुलांचे हार सजावटीसाठी वापरतात किंवा देवाला वाहिले जातात. रात्री पणत्या आणि दिव्यांनी विद्युत रोषणाई करून घर आणि गावं उजळवली जातात. अनेक गावांमध्ये आजही पहाटे आणि रात्री पणत्या लावण्याची प्रथा आहे. तिथे दिव्यांपेक्षा पारंपरिक पद्धतीच्या पणत्यांना अधिक महत्त्व दिलं जातं.

 

यमराजांसाठी दिवा

 

प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस(Dhantrayodashi) यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

 

मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।

त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

 

अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी. 

 

दीपदान कसे करावे?

 

स्कंद पुराणानुसार, अश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशीला (Dhantrayodashi) प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळी दीपदान करण्यासंदर्भात उल्लेख आल्याचे पाहायला मिळते. पणती हे अज्ञानाचा अंध:कार दूर करण्याचे आण‌ि तेज, समृध्द‌ी यांचे प्रत‌ीक असल्याने दीपदानाचे महत्त्व मोठे आहे, असे मानले जाते. दिवाळीत दीपदान केल्याने लक्ष्मी-नारायणाचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. लक्ष्मी देवी प्रसन्न करण्यासाठी दिवाळीत दीपदान करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते. दीपदानाचे महत्त्व, दीपदान कसे करावे? यांबाबत जाणून घेऊया…

 

दिवाळीत दीपदान करणे अत्यंत शुभफलदायी मानले जाते. नवग्रहांचा राजा असलेला सूर्य या कालावधीत तूळ राशीत प्रवेश करतो. यामुळे वातावरणात काहीसे अंधारमय झाल्यासारखे भासते. या कारणामुळे दिवाळीत दीप प्रज्ज्वलित करून जप, तप आणि दान व स्नान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा संपूर्ण महिनाभर दीपदान करावे, असे सांगितले जाते. मात्र, महिनाभर दीपदान करणे शक्य नसल्यास दिवाळीतील पाच दिवस दीपदान करावे, असे सांगितले जाते.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts