अजूनही गावकरी लालपरीच्या प्रतीक्षेत.

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील जनतेचे नुकसान : 

पेट्रोलच्या वाढत्या किमती बघून बहुतांशी ग्रामीण भागातील जनता ही अजूनही लालपरीवर अवलंबून आहे. परंतू आगारातील कर्मचाऱ्यांची संपात उडी घेवून आज सुमारे चार महिन्याच्या जवळपास कालावधी लोटला आहे. अनेक बसेस आजही आगाराच्या आवारात उभ्या आहेत. तर बोटावर मोजण्यात इतक्याच एस.टी. रस्त्यावर धावत आहे. आगारातर्फे शहरी भागात काही गावांसाठी फेऱ्या सुरु करण्यात आल्या असल्या तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना व नागरिकांना खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र ग्रामीण भागातील जनता अजूनही लालपरीच्या प्रतीक्षेत आहे. एकिकडे आगारातील कर्मचाऱ्यांचा संप केव्हा संपेल याचा काही पत्ता नाही.

एकीकडे मात्र एस. टी. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या मागण्या म्हणजे  एस.टी. महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. परंतु अजूनही हा संप मिटलेला नाही. या संपावर तोडगा निघत नसल्याने काही कर्मचारी कामावर रुजू होत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात. संपापुर्वी या विद्यार्थ्यांना बसेसचा प्रवासासाठी आधार होता. मात्र बस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांना शहरातील विद्यालय, महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सद्या परीक्षा कालावधी सुरु असून मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. 

ग्रामीण भागांतील लोकांना खाजगी वाहनातून अधिक पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, गावकरी, शेतकरी, गरजु आणि बऱ्याच लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बससेवा केव्हा पूर्ववत सुरु होईल याची त्यांना प्रतीक्षा लागली आहे. नियमित बसने प्रवास करणारे प्रवासी, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी विद्यार्थी बसचा प्रवास करण्यासाठी पासचा उपयोग करतात. मात्र तीन चार महिन्यापासून सुरु असलेला संप मिटला नसल्याने अनेकांनी काढलेल्या पासची मुदत आता संपल्याने पास वाया जाऊन त्या रद्दीत टाकाव्या लागत आहे. 

महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थिनींना मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत पास मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक मुलीला बाहेर शिक्षणासाठी पाठवितात. परंतु बस बंद असल्यामुळे शाळेत जाणे गरजेचे असल्याने खासगी वाहन चालकांना पैसे देऊन शाळेत पाठवित आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. मात्र एस. टी कर्मचाऱ्यांचा संप केव्हा संपेल ह्याची प्रतीक्षा आता संपूर्ण गावकऱ्यांना लागलेली आहे.

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts