मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कार मधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे.
सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात
नेमकं काय घडलं होतं?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माहितीनुसार, “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या सापडल्या आहेत.”
“या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल,” असंही अनिल देशमुख म्हणाले.
सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल याविषयी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, “काल पहाटे 1.30 वाजता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिका-यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली.”
“आम्ही प्रत्येक बॉक्सवर बार कोड लावतो त्याद्वारे जिलेटीन कुणी केले घेतले त्याचा कसा प्रवास झाला याची माहिती आमच्याकडे आणि Petroleum and explosive safety Organization या संस्थेकडे कडे असते. मात्र, नुसत्या जिलेटीनच्या कांड्या पाहून त्यानुसार ते आले कुठून सांगता येणार नाही कारण त्यावर कुठलीही प्रकारचा बारकोड नसतो,” पुढे ते म्हणाले की,
मुकेश अंबानी यांच्या घराजवळील वाहनात सापडलेलं जिलेटिन सुटं होतं. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनी सुट्या एक्स्पोजिव्ह कांड्या विकत नाही. येथील एक्स्प्लोझिव्ह कंपनी पॅकिंग बॉक्समध्येच त्यावर संबधित कारखानदार किंवा अन्य कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनी संचालकांचे कोड टाकून जिलेटीनचे बॉक्स विकतात. वाहनात आढळलेल्या जिलेटीनच्या कांड्या कुठल्या डब्यातील आहे याचा शोध घेतला तर अधिक माहिती मिळू शकते, असंही त्यांनी म्हटलं.
मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या.
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, “वाहनाचा रंग घालवलेला आहे. वाहन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.
स्फोटकं का ठेवली यांच्या मूळाशी आम्ही जाऊच. पण तपास सुरु असल्याने सध्यातरी भाष्य करणं चुकीचं आहे. मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचं कारण नाही. गरज पडली तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल.”