शनिवारी ,१७ एप्रिल ला संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना वांगणी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर घडली.
प्लॅटफॉर्मवरून एक अंध महिला तिच्या वर्षांच्या मुलासह जात होती. अचानक हा मुलगा तोल जाऊन ट्रॅकवर पडला. त्याची अंध आई चाचपडत तो कुठे आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी त्याच ट्रॅकवरून समोरून उद्यान एक्स्प्रेस धडधडत येत होती.त्याचवेळी मयुर शेळके हे वांगणी स्टेशनला उद्यान एक्स्प्रेसला झेंडा दाखवण्याचं काम करत होते.
ड्यूटीवर असणाऱ्या मयुर शेळके यांनी धाव घेत रेल्वे रुळांवरच्या त्या मुलाला प्लॅटफॉर्मवर ठेवलं, स्वतःही प्लॅटफॉर्मवर चढले आणि काहीच क्षणांत उद्यान एक्स्प्रेस बाजून धडधडत गेली.
या मुलाला रेल्वे ट्रॅकवर पडलेलं पाहून क्षणभर आपल्यालाही भीती वाटली, पण तरीही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं मयुर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. या मुलाचा जीव वाचवता आल्याचा आपल्याला आनंद आणि समाधान असल्याचंही मयुर म्हणाले.
आपल्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या या तरुणाचे आभार या मुलाच्या आईने – संगीत शिरसाठ यांनी मानले आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या मयुर यांना मोठा पुरस्कार देण्यात यावा असंही त्यांनी म्हटलंय. मुलगा आपल्या जवळ नसून ट्रॅकवर पडल्याचं लक्षात आल्यावर या व्हीडिओमध्ये संगीता प्लॅटफॉर्मवर चाचपडत अंदाज घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनीही मयुर शेळके यांचं ट्वीट करत कौतुक केलंय.
मध्य रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी काल मयुर शेळकेंचा सत्कार केला.
सोशल मीडियावरही अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत मयुर यांचं कौतुक केलंय.