येत्या मराठी नवीन वर्षात मुंबईकरांना मिळणार हि गोड बातमी. तुमचा प्रवास सुसह्य करणाऱ्या मेट्रोबाबत माहिती देत आहोत. लवकरच हि मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत होणार रुजू. नेमकी बातमी काय ? हे सविस्तर जाणुन घ्या.
डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या ‘मेट्रो ७’ मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले सीएमआरएस प्रमाणपत्र मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) शुक्रवारी प्राप्त झाले. त्यामुळे आता लवकरच पश्चिम उपनगरातील नागरिकांचा प्रवास सुसह्य होणार असून, त्यांना मेट्रोचा गारेगार प्रवास करता येणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर २ एप्रिल रोजी मुंबईकरांसाठी या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बहुप्रतीक्षित मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरील आरे ते दहिसर पूर्व दरम्यानचा मार्ग खुला केला जाणार आहे. महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाने याची तयारी पूर्ण केली असून, स्थानकांवर कर्मचारी नियुक्ती जवळपास पूर्ण झाली आहे. मेट्रो मार्गिकेची शेवटची चाचणी बुधवारी पूर्ण झाल्यावर शुक्रवारी एमएमआरडीएला सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले. आता सर्व अडथळे दूर झाले असून मुंबईतील दुसरी मेट्रो धावू लागणार आहे. सद्यस्थितीत मुंबईत सहा डब्यांच्या ११ मेट्रो गाड्या चारकोप डेपोत दाखल झाल्या आहेत.
‘मेट्रो मार्गिका सुरू करण्यासाठी सीएमआरएसने प्रमाणपत्र दिले. लवकरच ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाईल. तसेच मेट्रो २अ मार्गिकेच्या डी. एन. नगर ते डहाणूकरवाडी आणि मेट्रो ७ मार्गिकेच्या अंधेरी पूर्व ते आरे या दुसऱ्या टप्पाचे कामही आगामी चार ते पाच महिन्यात पूर्ण केले जाईल. – एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
सुरू होणारी स्थानके : डहाणूकरवाडी, कांदिवली (प), पहाडी एक्सर, बोरिवली (प), एक्सर, मांडपेश्वर, कांदरपाडा, आनंदनगर, दहिसर (पू).
—–
मेट्रो ७
लांबी : १६.४७ किमी
एकूण स्थानके : १३
अन्य मेट्रोशी जोडणी : अंधेरी पूर्व स्थानकात मेट्रो १ आणि जोगेश्वरी पूर्व
……..
तिकीट दर
किमी दर रुपये
०-३ १०
३-१२ २०
१२-१८ ३०
१८-२४ ४०
२४-३० ५०