ब्राझीलमधील पूर्वेकडील भागात करोनाशी दोन हात करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे मिगुएल निकोलेलिस यांनी सांगितले की, ब्राझील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाशी दोन हात करत आहे. त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटले की, सध्याचे संकट गंभीर आहे. अणूभट्टीच्या अपघातासारखे असून संकट आता नियंत्रणाबाहेर आहे. जुलै महिन्यापर्यंत ब्राझील मधीलकरोना बळींची संख्या सहा लाखांहून अधिक होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
परिचारिकेची शक्कल:
करोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. ब्राझीलमध्ये करोनाने थैमान घातले असून बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांची गर्दी वाढू लागली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी एका रुग्णालयातील परिचारिकेने एक कल्पना वापरली. या नर्सने दोन ग्लोव्हज बांधून त्यांच्यात कोमट पाणी भरले आणि रुग्णाच्या हातावर ठेवले. या ग्लोव्हजमुळे मानवी हाताचा स्पर्श असल्याचा भास रुग्णाला होतो.
परिचारिकेच्या या कल्पनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या प्रयोगाला मोठी दाद मिळाली आहे. ब्राझीलमधील परिचारिकेच्या ग्लोव्हजचा फोटो गल्फ न्यूजच्या सादिक समीर यांनी ट्विट केला आहे. अनेकांनी हा फोटो म्हणजे करोनामधील आणखी एक विदारक छायाचित्र असल्याचे म्हटले. करोनाच्या संसर्गामुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्माऱ्यांशिवाय इतरांना बाधितांना भेटता येत नाही. त्यामुळे कोमट पाणी भरलेल्या ग्लोव्हजमुळे रुग्णांमधील एकटेपणाची भावना दूर होऊ शकते.
कोरोना मुळे अनेकांना रुग्णालयात एकटेच राहावे लागते, त्यात मानसिक स्वास्थ्य यावरही काही प्रमाणात परिणाम होतो. त्यातच या परिचारिकेची शक्कल तिची रुग्णाविषयीची आत्मीयता दिसून येते. नेटकरी हा फोटो बघून थोडे हळवे झाले आहेत असे या फोटो च्या कमेंट सेक्शन मध्ये दिसून आले.