ती’ कोहिनूर हिर्याच्या मुकुटाची महाराणी आणि ‘तो’ सुवर्णकाळ

जागतिक स्तरावरची मोठी बातमी ही अख्या जगावर परीणाम करणारी असते. ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या वृद्धपकाळ निधनाने संपुर्ण जगात दुखवटा व्यक्त केल्या जात आहे. ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. त्या ९६ वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. या दरम्यान राजपरिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. एलिझाबेथ यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसतील. 

 

प्रकृतीत बिघाड झाल्याने

 

एलिझाबेथ स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या चिंताजनक प्रकृतीमुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बालमोरल कॅसलमध्ये अगोदरच दाखल झाले होते. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनीदेखील राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. बकिंघम पॅलेसच्या या बातमीने संपूर्ण देश चिंतेत आहे. युनायटेड किंगडममधील लोकं राणी आणि तिच्या कुटुंबासोबत असल्याचे त्यांनी ट्विट केले होते.

 

राणी एलिझाबेथ यांचा जन्म 

 

एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. एलिझाबेथ यांचे शिक्षण घरातच झाले. एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज यांचे १९५२  मध्ये निधन झाले. त्यानंतर एलिझाबेथ यांना १९५२ मध्ये ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सलग सात दशके ब्रिटनची महाराणी म्हणून कामकाज पाहिले. एलिझाबेथ या जगात सर्वाधिक काळ सत्ता हाकणाऱ्या महाराणी आहेत. 

 

विवाह

 

राणी एलिझाबेथ यांचा विवाह प्रिन्स फिलीप यांच्यासोबत १९४७ मध्ये झाला. मागील वर्षी, ९ एप्रिल २०२१ मध्ये वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. 

 

कौटुंबीक माहिती

 

राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलिप यांचे ९ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. राणीला चार मुले आहेत. प्रिन्स चार्ल्स, राजकुमारी ऍनी, अँड्र्यू आणि एडवर्ड, ज्यांच्यापासून त्‍यांना आठ नातवंडे आणि १२ पणतू आहेत.

 

‘तो’ कोहिनूर हिऱ्यांचा मुकुट

 

क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी आपल्या राज्यारोहणाच्या ७० व्या वर्धापनदिनी ती घोषणा केली होती. परंतु राणी कॅमिलाला अमूल्य कोहिनूर हिऱ्याचा मुकुट मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. राणी एलिझाबेथ यांच्या या घोषणेनंतर आता ब्रिटनच्या राजघराण्याच्या भवितव्याला नवी दिशा मिळेल, असंही मानलं जात आहे.  राणीच्या या मुकुटाचं वैशिष्ट्य म्हणजे कोहिनूर हिरा आहे. हा १०५.६ कॅरेटचा मौल्यवान हिरा आहे. तो १४ व्या शतकात भारतात सापडला होता आणि मधल्या अनेक दशकांमध्ये तो अनेकांच्या हातात गेला होता. अखेरीस तो राणी एलिझाबेथ यांना मिळाला. आणि हा हिरा राणी एलिझाबेथ यांच्यासाठी बनवलेल्या प्लॅटिनम क्राउनमध्ये जडवण्यात आला होता.

 

राणी एलिझाबेथ यांची ७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द

 

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची कारकीर्द थोडी-थोडकी नाही तर तब्बल ७० वर्षांची ठरली. या कालावधीत त्यांनी ब्रिटनचे १५ पंतप्रधान पाहिले. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चार्ल्स हे ब्रिटनचे किंग झाले आहेत. एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या नाही तर १४ आणखी देशांच्या महाराणी होत्या. हेच पद आता किंग चार्ल्स यांच्याकडे आलं आहे. 

 

१० दिवसांनंतर अंत्यसंस्कार

 

महाराणींच्या पार्थिवावर १० दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधानांच्या वतीने एक संदेश जारी केला जाईल. पंतप्रधानांचा संदेश येण्याआधी सरकारमधील कोणताही मंत्री वक्तव्य देणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. देशभरात एक मिनिटाचे मौन ठेवण्यात येईल आणि नवीन राजा प्रिन्स चार्ल्स यांच्यासह पंतप्रधान ट्रस नागरिकांना संबोधित करतील.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts