संत कबीर व्यक्तित्व आणि विचार | Sant Kabir Information In Marathi

Kabir Das :

संत  कबीर हे  भारतातील एक महान कवी आणि समाजसुधारक होते. भारतीय जन्मभूमीतील सर्व संत व्यक्तिमत्त्वामध्ये संत कबीर हे सर्व श्रेष्ठ असे महान व्यक्तिमत्तव म्हणून ओळखले जाते. संत कबीरांनी आपल्या दोहयांच्या माध्यमातुन भारतिय संस्कृतीचा प्रसार प्रचार केला या व्यतीरीक्त त्यांनी जीवनाशी निगडीत जे उपदेश केले आहेत त्यांना आत्मसात करून आपण आपले जीवन आदर्श बनवु शकतो. संत कबीर  हे थोर विचारवंत होते ते काढच्या पुढच्या पीडीचा विचार करत असे आपल्या दोहयांच्या माध्यमातुन समाजात पसरलेल्या अंधश्रध्दा, चालिरीतींना, भेदभावाला दुर करण्याचा प्रयत्न त्यानीं केला.

Table of Contents

संत कबीर यांचे जीवनकार्य | Sant Kabir Information In Marathi :-

नाव (Name) संत कबीरदास (Kabir Das)
जन्मगाव  (Birthplace) लहरतारा ताल, काशी
जन्म (Birthday) ई. स . 1398 / 1440
आई (Mother Name) नीमा
वडिल (Father Name) नीरू
पत्नी (Wife Name) लोई
मुल (Children) कमाल,कमाली
मृत्यु (Death) 1518,मगहर, उत्तर प्रदेश
Sant Kabir Information


संत कबीर यांचा जन्म :

संत कबीर यांचा जन्म कधी व कुठे झाला याविषयी बरेच मतभेद आहेत सामन्यपणे इ . स .  १३९८ किंवा १४४० हे जन्मवर्ष मानले जाते परंतु हा अंदाजच होय कारण कबीर हे निरू आणि निमा या जुलाह दांम्पत्याला रस्त्यावर सापडलेले मूल  होते त्यामुळे कबिरच्या धर्माविषयी म्हणजे ते जन्माने हिंदू होते कि मुस्लिम याविषयी वाद करण्यात काही अर्थ नाही . तसेच कबीरांनी  स्वतःला कोणत्याही विशिष्ट धर्माचे आहोत असे घोषित केले नाही.

कबीरांचा गुरु :

काही इतिहासकारांच्या म्हण्यानुसार स्वामी रामदास हे  संत कबीरांचे गुरु होते कबीर हे मुस्लिम कुटुंबात राहत असूनही ते आदिरामाचे उपासक होते. पण मात्र कबीरांनी स्वतःला कोणत्याही धर्माचा असल्याचे घोषित केले नाही व कुणाही एका व्यक्तीचे स्पष्टपणे गुरु म्हणून नाव घेतलेले नाही .परंतु , कबीरांनी लोकांना गुरु चे आपल्या आयुष्यात असलेले महत्व आपल्या दोह्यतून पटवून दिले त्यानीं  जीवनात गुरुची महत्ता मान्य केली . ते म्हणतात,

गुरू कीजै गहिला, निगुरा न रहिला ।

गुरु बिन ग्यांन न पाईला रे भाइला ।।

गुरूशिवाय सत्यज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. साधनेसाठी निगुरा अर्थातचगुरूहीन राहून काहीही साध्य होणार नाही. प्रत्येकाने आपला गुरू निवडणे आवश्यकआहे.

कबीरांच्या मते, गुरू ज्ञानप्रदाता आहे. ज्ञानाचे ते अक्षय भांडार आहे. साधनेचे प्रथम तत्त्व सद्गुरूच आहे. ते ज्ञानस्रोत आहे. गुरूच्या ज्ञानामुळे शिष्यांच्या अतिचंचल व असंयमित मनावर संयम साधला जातो. कबीराला सद्गुरूशिवाय कोणीही तितका सखा वाटला नाही. त्यांच्या मते, गुरूच्या कृपेने आनंदाचे दर्शन होते. संसारिक दृष्टीला परिवर्तित करून अत्युच्च दृष्टीचा लाभ होतो. जीवनातील समस्त दुःखांना गुरु दूर करतो आणि सुखमय स्थिती प्राप्त करून देतो. त्याच्या कृपेने हृदयकमल होते.

संत कबीर यांचे सामाजिक कार्य । Social Work Of Sant Kabir

संत कबीर हे थोर विचारवंत होते आपल्या दोहयांच्या माध्यमातुन समाजात पसरलेल्या अंधश्रध्दा, चालिरीतींना, भेदभावाला दुर करण्याचा प्रयत्न त्यानीं केला.संत कबीरांना  हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते .

ज्या काळात कबीरांचा आर्विभाव झाला, त्यावेळी तत्कालीन धर्मीयांत पौराणिक मताचे प्राबल्य होते. धर्माच्या आवर्तात जी सर्वसामान्य जनता जगत होती, ती अंधश्रद्धेच्या पाशवी जाळ्यात गुरफटून गेली होती त्यामुळे लोकांना शिकवण देत कबीरांनी जनजागरणाचा मार्ग अवलंबिला.अंधश्रद्धेच्या धगधगत्या ज्वाळातून मानवाला मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यानां नैतिकता , मानवता आणि अध्यत्त्मिकाचा धडा शिकवला.

संत कबीरांचे विचार

ईश्वराविषयक मत :

कबीरांच्या काव्यात अनेक नावांचा उल्लेख विविध संदर्भात येतो. पारंपरिक अर्थाने ईश्वर समजली जाणारी राम, हरी, गोविंद, केशव, माधव अशी नावे त्यांच्या काव्यात येताना दिसतात. त्यामुळे कबीर ईश्वरवादी होते की अनिरीश्वरवादी असा संभ्रम निर्माण होतो. 

कबीरांच्या काव्यात अल्ला, विष्णू, कृष्ण, गोविंद, राम, खुदा, करीम, गोरख, महादेव, सिद्ध, नाथ आदी नावे ईश्वरसदृश आलेली दिसतात. ही नावे विशिष्ट ईश्वराचा आकार, स्वरूप दर्शवीत नाहीत तर त्याद्वारे विशिष्ट गुण ध्वनित करतात. ते कार्य कबीरांनी अत्यंत शिताफीने केले आहे. ‘राम’ या शब्दाचे उदाहरण घ्यायचे झाल्यास त्यांना अभिप्रेत असलेला राम हा निराकार आहे. त्याला रूप नाही, आकार नाही. तो समुद्र नाही, पर्वत नाही. धरती नाही, आकाश नाही. सूर्य नाही. चंद्र नाही. पाणी नाही, हवा नाही, तर समस्त दृश्यमान पदार्थापेक्षा विलक्षण, सर्वांपेक्षा वेगळा, वेद व भेद, पाप व पुण्य इत्यादी सर्व गोष्टींपासून अलिप्त असलेले अनुपम त्रैलोक्यविलक्षण असे परमतत्त्व आहे.

मनाची एक्रागता :

संत कबिरांच्या मते मन  हे सर्व घटनांचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे सर्वांचे मूळअसल्यामुळे त्याच्या आज्ञेनुसार घटना घडत असतात. सर्व व्यवहारांचे उगमस्थान मन असल्यामुळे मनुष्याचे व्यवहार मनःप्रधान असतात. मनुष्याचे मन जर शुद्ध असेल तर मनुष्याच्या छायेप्रमाणे सुख त्याच्या सोबत नित्य असते. त्याचे मन दुष्ट असेल तर चालत्या बैलगाडीचे चाक ज्याप्रमाणे बैलाच्या पायांचा पाठलाग करते त्याप्रमाणे दुःख माणसाचा पाठलाग करते. मन हेओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण तयार करणारा जसा बाणाला सरळ करतो त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुष मनाला संयमित करतो. 

चंचल मनावर नियंत्रण करून त्याला संयमित केले तर माणसाला शूराची स्थिती प्राप्त होऊ शकते. मग तो मृत्यूलाही घाबरत नाही.मनाची मलिनता दूर करणे हा केवळ वैयक्तिक सुखाचा मार्ग होता परंतु कबीरांनीत्यापुढे जाऊन वैयक्तिक सुखासोबत एकूण सामाजिक सुखाची कल्पना मांडली.

राजकीय विचार :

कबीरांनी जीवनाचा सर्वस्पर्शी विचार दिला. त्यामुळे त्यांनी इतर विचारांप्रमाणे राजकीय विचाराला आपल्या तत्त्वज्ञानात विशेष महत्त्व दिले. मध्ययुगीन राजकीय स्थितीचे त्यांनी अतिशय संयमित वृत्तीने प्रत्यक्षावलोकन केले. तत्कालीन राजकीय क्षेत्रात त्यांना प्रत्ययास आले की, सत्ताधारी अर्थातच नरंकुश प्रवृत्तीचे असून आपल्या विलासी जीवनात मदोन्मत्त झाले आहेत. आपल्या प्रजेचे सुख बघण्याकडे त्यांना जराही उसंत नाही. प्रजा आपल्या दैनंदिन व्यवहारात मश्गूल असल्यामुळे त्यांनाही राज्यकारभाराशी सोयरसुतक नाही. या दोन प्रवृत्तींचा कबीरांच्या मनावर निश्चितच परिणाम झाला. त्यांनी या प्रवृत्तींची फलनिष्पत्ती कशी असते, यासंबंधी आपल्या अनेक काव्यात विवेचन केले.

संत कबीरांचे दोहे | Sant Kabir Dohe in Marathi

कबीर आप ठगाइए, और न ठगिए कोय।

आप ठग्यां सुख ऊपजै, और ठग्यां दुख होय ॥

संत कबीर म्हणतात की ‘दुसऱ्यांना लुबाडण्याऐवजी प्रत्येकाने स्वतःलाच लुबाडावे. दुसऱ्यांनालुबाडल्याने हृदयपीडा होतात परंतु स्वतःलाच लुबाडल्याने सुख प्राप्त होते.’

याचा अर्थ कोणी कोणाचे शोषण करू नये, हा कबीरांचा विचार आजच्या काळातील शोषण प्रक्रियेला पायबंद घालण्यास निश्चितच सहाय्यभूत ठरणारा आहे.

प्रत्येक मानवाने आपल्या जीवनोपयोगासाठी किती धनसंपत्तीचा वापर करावा, यासंबंधी कबीर म्हणतात,

सांई इतना दीजिए, जामे कुटुम्ब समाये ।

भुंखा मैं भी न रहूं, साधु न भुंखा जाय ।

आपल्या कुटुंबाच्या आवश्यकतांची परिपूर्ती करता येईल, अतिथींचा सत्कार करता येईल, कुणीही उपाशी राहणार नाही आणि साधू लोकांची सेवा करता येईल इतके पर्याप्त धन प्रत्येक व्यक्तीजवळ असणे आवश्यक आहे, असे कबीरांनी निक्षून सांगितले.

धनसंपत्तीच्या लोभापायी मानवी मन अस्थिर व चंचल बनते. त्यामुळे मानव इतरांची पिळवणूक करून स्वतः अधिकाधिक श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करतो. एक श्रीमंत दुसऱ्या श्रीमंताला हडपण्याचा प्रयत्न करतो. धनसंपत्तीमुळे मानसिक चंचलता निर्माण होते. त्यातूनच निर्धनाच्या मनात श्रीमंताविषयी द्वेष, घृणा, ईर्षा आदी भाव उत्पन्न होतात. श्रीमंत अधिक श्रीमंत बनण्याच्या ईर्षेने पेटलेला असतो. त्यातूनच समाजात अनाचार, चोरी, कपट आदी दुर्गुणांचा सुळसुळाट होतो. अस्थिर संपत्तीच्या मागे लागून माणसाचे मन अस्थिर व चंचल झालेले असते. या चंचल मनाला लगाम लावण्यासाठी कबीरांनी संपत्तीकडे विवक्षित दृष्टीने बघण्याचा हितोपदेश केला,

सम्पत्ती देखि न हरषिए, विपत्ती देखि न रोई। 

ज्यू सम्पति त्यूं विपत्ती है, करना करै सुं होई ।।

संपत्तीकडे बघून आनंदीत होऊ नका. ती गेल्यावर रडत बसू नका. जशी ती संपत्ती आहे तशीच ती विपत्तीही आहे. म्हणूनच संपत्तीकडे सम्यक दृष्टीने बघावे, असे कबीर म्हणतात.

कथ कहानी प्रेम की, कछु कही न जाई।

गूंगे केरि सरकरा, बैठे-बैठे मुसुकाई || टेक ॥

भूमि बिना अरू बीज बिन, तरवर एक भाई ।

अनंत फल प्रकासिया, गुर दीया बताई ॥

मन थिर बैसि बिचारिया, रामहि लौ लाई।

झूठी अनभै बिस्तरी, सब थोथी बाई ।

कहै कबीर सकति कछु नाँही, गुरू भया सहाई ।

आंवन जांनी मिटि गई, मन मनहि समाई।

भावार्थ: कबीर म्हणतात, प्रेमाचे मर्म अवर्णनीय आहे. ते अकथनीय आहे. जसामूक मनुष्य साखरेचा स्वाद घेऊ शकतो परंतु त्याचे वर्णन करू शकत नाही,त्याचप्रकारे प्रेमानुभूतीचे वर्णन करता येत नाही.

प्रेमरूपी फळ अशा वृक्षाला लागते, जो विना भूमी व बीजापासून उत्पन्न होतो. या वृक्षाला अनंत फळे येतात.

सद्गुरूने याचे मर्म सांगितले आहे. या फळाची प्राप्ती मन स्थिर करून विचारपूर्वक चित्ताग्रता केल्यानेच होते. अन्य सर्व अनुभव दूषित वायूसमान असतात.जे शरीराला विकारग्रस्त करतात.

कबीर म्हणतात, गुरूच्या मदतीशिवाय या फळाची प्राप्ती होत नाही. माझ्यात अशी कोणतीही शक्ती नाही की, मी त्याला गुरूशिवाय प्राप्त करू शकेन. या अनुभूतीने संभ्रमित मनाचा नाश करता येतो आणि व्यष्टी-मन समष्टीत परिवर्तीत करता येते.

अल्लह राम जिऊं तेरै नांई। 

बंदै ऊपरि मिहरि करौ मेरे सांई ॥ टेक ॥ 

क्या लै मूड़ी भुइं सौं मारें, क्या जल देह न्हवाएं। 

खून करै मिसकीन कहावै, अवगुन रहै छिपाएं ।।

क्या ऊजू जप मंजन कीए, क्या मसीति सिरूनाएं। 

दिल महिं कपट निवाज गुजारै, क्या हज काबै जाएं।। 

बाह्यन ग्यारसि करे चौबीसौं, क्या काजी मांह रमजांना | 

ग्यारह मास कहौ क्यूं खाली, एकहि मांहि नियांना ।। 

जौ रे खुदाइ मसीत बसतु है, और मुलुक किस केरा। 

तीरथि मूरति राम निवासी, दुहु महिं किनहु न हेरा ।। 

पूरब दिसा हरी का बासा, पच्छिमि अहल मुकांमा। 

दिल महिं खोजि, दिलै दिलि खोजहु, इहंई रहीमां रामां ॥ 

जेते औरति मरदन उपानें, सौ सभ रूप तुम्हारा। 

कबीर पुंगरा अलह राम का, सोइ गुर पीर हमारा ।।

भावार्थ: कबीर म्हणतात, हे अल्ला ! हे राम! मी तुझे नामस्मरण करीत जगत आहे. हे माझ्या स्वामी, आपल्या सेवकावर कृपा कर!

नमाजाच्या वेळी जमिनीवर डोके टेकणे किंवा मंदिरातील देवासमोर माथा टेकण्यात काय अर्थ? पवित्रतेच्या दृष्टीने शरीराला पाण्याने स्वच्छ करण्यात काय अर्थ ?

हिंदू-मुस्लीम दोन्ही मतावलंबी आपल्या पापाला लपविण्यासाठी धर्माच्या नावावर जीवांची हत्या करतात आणि स्वतःला ‘दीन’ समजतात. नमाजाच्या पूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ करणे, जप करणे आणि तीर्थक्षेत्री स्नान करण्यात काय अर्थ ? मशिदीत नतमस्तक झाल्याने काय लाभ? हृदय कपटाने भरले असता, अल्लासाठी,

नमाज करण्यात काय लाभ? तसेच हजसाठी काबा येथे जाण्यात काय लाभ? ब्राह्मण (हिंदू) वर्षभर चोवीस एकादशीचे व्रत करतो आणि काजी (मुसलमान) रमजान महिन्यात रोजा करतो.

कबीर पृच्छा करतात, वर्षाची अकरा महिने कोणीच व्रत का करीत नाही? पूर्ण वर्षाचा एक महिन्यात समावेश होतो काय? ईश्वराचा निवास फक्त मशिदीत

असेल तर अन्य स्थळी त्याचा निवास नाही काय? ईश्वर फक्त तीर्थ व मूर्तीतच वास करतो असे समजले जाते परंतु या दोन्ही स्थळी कोणी ईश्वराला शोधले नाही.

ईश्वर पूर्व दिशेला आहे असे समजून हिंदू पूजा करतात. तो पश्चिमेला आहे असे समजून मुस्लीम नमाज करतात. कबीर म्हणतात, हे दोघेही भ्रमात आहेत. वास्तविक ईश्वराचा वास मंदिर-मशिदीत किंवा पूर्व-पश्चिमेला नसून तो प्रत्येक ठिकाणी आहे. त्याचा शोध घ्या ! राम-रहीम तिथेही मिळेल.

जगात जितके स्त्री-पुरुष जन्माला आले, ते ईश्वराचे रूप आहेत. कबीर अल्ला अन् राम या दोघांचा मुलगा आहे आणि तेच कबीराचे पीर अन् गुरू आहेत.

 

संत  कबीर यांचा मृत्यू । Death Of Sant Kabir Das

संपूर्ण आयुष्य काशीमध्ये घालविल्यानंतर जीवनाच्या अखेरच्या पर्वात मगहर येथे त्यांना आश्रय शोधावा लागला. मगहर येथे प्रविष्ट होण्यामागची त्यांची भूमिका अतिशय क्रांतिकारक स्वरूपाची होती. मगहर या गावाशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध असावा किंवा त्या गावाविषयी त्यांच्या मनात विवक्षित आदर असावा. म्हणून त्यांनी आपल्या काव्यात या गावाचा अनेकदा उल्लेख केलेला दिसतो

सकल जनम शिवपुरी गंवाया। 

मरति बार मगहर उठि धाया ।।

संत कबीर यांचा मृत्यू इ .स . १५१८ मध्ये  झाला . मृत्यूच्या छायेत असतानाही मोक्षप्राप्र्तीच्या भोंगळ कल्पनांचा त्यानीं  आपल्या निर्माणक विचारांना जराही स्पर्श न होऊ देण्याची तसदी घेतली. आपल्या निर्णयाच्या पुष्टयर्थ काव्याद्वारे उद्बोधन करताना कबीर म्हणतात ,

क्या काशी क्या उसर मगहर रामहृदय बस मोरा 

जो काशी तन तजै कबीरा ।

तौ रामहि कौन निहोरा ।।

‘मी खरा भक्त असेल तर काशीत मेलो काय किंवा मगहरला, तरी राम कसा अंतरणार? अर्थातच मला मुक्ती मिळालीच पाहिजे.’ कबीरांचा हा दृढनिश्चय अनेक पदरी सत्यान्वेषण करणारा असून भ्रममूलक आवर्तातून सामान्य जनतेची मुक्ती करण्यासाठी संप्रेरक स्वरूपाचा आहे.

मृत्यूच्या अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या तत्त्वांशी इमान राखणारा आणि माणसाच्या मुक्तीचा मार्ग प्रदीप्त करण्यासाठी अनेक संकटांशी धैर्याने सामना करणारा कबीर नावाचा वीरपुरुष निसर्गाच्या शक्तीत इ.स. १५१८ साली विलीन झाला. युगायुगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या महापुरुषाची प्राणज्योत अखेर मावळली.

FAQ

1) संत कबीर यांचा जन्म कधी झाला?

Ans: संत कबीर यांचा जन्म कधी व कुठे झाला याविषयी बरेच मतभेद आहेत सामन्यपणे इ . स . १३९८ किंवा १४४० हे जन्मवर्ष मानले जाते.

2) संत कबीर मुस्लिम होते की हिंदू ?

Ans: कबीर हे निरू आणि निमा या जुलाह दांम्पत्याला रस्त्यावर सापडलेले मूल  होते त्यामुळे कबिरच्या धर्माविषयी म्हणजे ते जन्माने हिंदू होते कि मुस्लिम याविषयी वाद करण्यात काही अर्थ नाही . तसेच कबीरांनी  स्वतःला कोणत्याही विशिष्ट धर्माचे आहोत असे घोषित केले नाही .

3) संत कबीर यांच्या पत्नीचे नाव काय ?

Ans:कबीरदास यांचा विवाह वनखेड़ी बैरागींची कन्या “लोई” हिच्याशी  झाला.

4) संत कबीरांना किती मुले होती ?

 Ans:  संत कबीरांना दोन मुले होती ,कबीरांच्या मुलाचे नाव कमाल आणि मुलीचे नाव कमाली होते.

5) संत कबीरांचे निधन कधी झाले ?

Ans: संत कबीर यांचा मृत्यू इ .स . १५१८ मध्ये मगहर या गावी झाला.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर  करा यातील माहिती तुम्ही तुमच्या निबंध लेखनाकरिता वापरू शकता .संत कबिरांबद्दल आणखी माहिती तुम्हाला असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आम्ही ती या लेखात अपडेट करू.लेख वाचल्याबद्दल धन्यवाद !

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts