हिवाळा म्हटलं की जास्त थंडी पडते आणि जास्त थंडी पडली की त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते त्यामुळे विविध त्वचेच्या तक्रारी जाणवतात जसे की खाज, लाल पुरळ, त्वचेवर बुरशी चढणे किंवा इतरही कारण. हिवाळ्यामुळे कित्येकदा आपली त्वचा खराबही होत असते. यासाठी आपल्या शरीरात डी जीवनसत्व असणे आवश्यक आहे खरंतर उन्हाळ्यामध्ये कोवळ्या उन्हात सूर्यप्रकाश घेणे हे अत्यंत फायद्याचे ठरते. परंतु सूर्यप्रकाशामुळे आपली त्वचा ही कोरडीच राहते त्वचा मुलायम होण्यासाठी अनेक टिप्स आहेत ज्या आपण हिवाळ्यात त्वचा मुलायम होण्यासाठी करू शकतो. खरंतर काही घरगुती उपायांमुळे कोरडी त्वचा सतेज व मुलायम बनू शकते. थंडीच्या दिवसांत घरात उपलब्ध काही पदार्थ कोरड्या त्वचेला संजीवनी देऊ शकतात.
थंडीमुळे त्वचा कोरडी होतेच, शिवाय लालसर डागही येतात. विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेवर थंडीचा खूप लवकर परिणाम होतो. त्यामुळे थंडीमध्ये चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी काही घरगुती उपाय उपयोगी पडू शकतात. हे घरगुती उपाय अत्यंत प्रभावशाली आणि कमी किमतीत फायदा देणारे आहेत त्यामुळे ह्या घरगुती टिप्स हिवाळ्यात त्वचेसाठी लाभकारी असून याचा नक्की उपयोग करा. यातील पहिली टीप म्हणजे,
१) ग्लिसरीन
कोणतेही ऋतू असो. पण ग्लिसरीन हे तिन्ही ऋतूत फायदाच देते. परंतु हिवाळ्यात ग्लिसरीन अनेक लोक हाता पायाला लावताना दिसतात. मेडिकल मध्ये इतर बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर पेक्षा अत्यंत कमी किमतीत आणि जास्त असरदार हे ग्लिसरीन आहे. त्वचा उजळवण्यासाठी देखील ग्लिसरीनचा उपयोग केला जातो. अंघोळीच्या पाण्यात दोन चमचे ग्लिसरीन टाकल्यास संपूर्ण शरीर मॉइश्चराईझ होत असते. तेव्हा हा उपाय नक्की करून बघा.
२) दुधाची साय आणि हळदीचे फायदे
दुधाच्या सायीमध्ये खूप जास्त तेलकट अंश असतो. त्यामुळे थंडीतही त्वचा मऊ राहते. सायीमध्ये चिमूटभर हळद घालून ती पेस्ट चेहरा, मान, हात व पायाला लावल्यास कोरडी त्वचा मुलायम बनते. सोबतच त्वचा उजळविण्यास जास्त मदत करते.
३) प्रभावशाली खोबरेल तेल
आपल्याकडे वर्षानुवर्षं खोबरेल तेल केसांसाठी वापरलं जातं. हे तेल त्वचेसाठीही तितकंच गुणकारी ठरतं. रोज रात्री झोपताना खोबरेल तेलाने मालिश केल्यास त्वचा सुंदर होते. चेहऱ्यावरही हलक्या हाताने खोबरेल तेल लावून रात्रभर तसंच ठेवावं. अशा पद्धतीनं नियमितपणे खोबरेल तेलाचं मालिश केल्यास त्वचा कोरडी पडत नाही. सोबतच त्वचा टवटवीत, आणि तेजस्वी दिसते.
४) ऑलिव्ह ऑइल आणि दूध
त्वचा खूप जास्त रुक्ष आणि कोरडी असल्यास ऑलिव्ह ऑइलचा वापर उपयुक्त ठरतो. त्यासाठी अर्धा कप थंड दुधात ऑलिव्ह ऑइल मिसळून घ्यावं. कापसाच्या बोळ्यानं हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल.
५) मध आणि बदामाचे फायदे
त्वचेसाठी बदामाचं तेल आणि मध यांचं मिश्रण उपयोगी असतं. बदामाचं तेल आणि मध दोन्ही घटक सारख्याच प्रमाणात घ्यावेत. ते मिश्रण व्यवस्थित एकत्र करून चेहऱ्यावर लावावं. थोड्या वेळानं चेहरा धुऊन टाकावा. या उपायामुळे त्वचेतला रुक्षपणा निघून जाईल व त्वचा मुलायम होईल. खरंतर मध हे मॉइश्चरायझिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मध चेहऱ्यावर लावल्याने शुष्क, कोरडी त्वचा नाहीशी होते. आणि मुलायम बनते.
६) मोहरीचे तेल
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोहरीचे तेल हे त्वचेसाठी गुणकारी आहे का ? तर होय ! खोबरेल तेलापेक्षा मोहरीचे तेल हे सर्दी होण्यापासून हिवाळ्यात बचाव करते. डोक्याला किंवा टाळूवर मोहरीचे तेल लावल्यास बहुदा सर्दी होत नाही सोबतच हे तेल त्वचेसाठी खूप गुणकारी असते. त्यामुळे मोहरीच्या तेलाचा जरी वेगळा वास येत असला तरीही ते हिवाळ्यात त्वचेसाठी आणि संपुर्ण शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या तेलाने कित्येक लोक संपुर्ण शरीराची मालिश देखील करीत असतात. अंगदुखी, शारीरिक व्याधी, सर्दी, पडसे, त्वचेवरील रोग बरे करण्याचे सामर्थ्य या अत्यंत कमी किमतीत मिळणाऱ्या तेलात आहे. त्यामुळे हिवाळ्यात नक्की या तेलाने मालिश करा. आणि त्वचा कोरडी होण्यापासून बचाव करा.