दिवाळी झाल्यावर चाहूल लगते ती म्हणजे तुळशी विवाहाची. खरतर या महिन्यांत आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतान प्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो. या सर्वांची व्यवस्थित जाणीव व्हावी अशा हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला. आणि ही परंपरा माञ आजही कायम आहे.
दिवाळी सणाची सांगता तुळशीच्या लग्नाने केली जाते. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न पार पडतं. देवउठनी एकादशीला विष्णू देव चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात त्यामुळे या एकादशीनंतर लग्नासारख्या मोठ्या सेलिब्रेशनला, चांगल्या कामांना सुरुवात केली जाते. प्राचीन काळापासून तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचं लग्न घरातील किशोरवयीन मुलासोबत किंवा शाळीग्राम दगडासोबत केलं जातं. शाळीग्रामासोबत तुळशीचं लग्न लावण्याच्या प्रथेमागील कहाणीदेखील तितकीच खास आहे.
दिवाळी ही खर्या अर्थाने संपते ती तुळशीचे लग्न झाल्यावर. तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत केले जातात. तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.
तुळशी विवाह विधी असा करा
तुळशीशी विवाह सोहळा कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाहाचे हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशीला नवीन वस्त्र पांघरले जातात. दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करण्याची पद्धत असते.