प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान का वाचावे ?

‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी सुरु होते ते आपले संविधान, कळत नकळत आपल्या आयुष्यावर खुप मोठा परिणाम करणारे आपले संविधान. आजच्या दिवसाचा उद्देश फक्त या संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यापुरता न ठेवता राज्यकारभारात संविधानातील मूल्यांचा समन्वय कसा साधला जातोय हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर भारत हा एक विकसनशील देश आहे. आणि या देशाचा संपुर्ण कार्यभार हा संविधानावर चालतो. म्हणजे संपुर्ण राज्याचे काम हे संविधानात सांगितलेल्या गोष्टींना अनुसरून आहे. सोबतच काही नवनवीन कायदे निर्माण होत असून ते सुद्धा आपल्या संविधानाचा भाग बनत आहेत. खरंतर फक्त संविधानामुळे राज्यकारभार हा सुरळीत, पारदर्शक, आणि सुलभरीत्या होत असल्यामुळे सर्व भारत वासियांना आपले हक्क अधिकार व कर्तव्ये माहित झाले आहेत. संविधानाची उद्देश्य पत्रिका ही ‘एकता’ टिकवून ठेवण्यासाठी प्रेरित करते. आणि हे प्रत्येकाने शालेय जीवनापासून अनुभवले असेलच. 

 

आज २६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. आणि तेव्हापासून सर्व भारतीयांना त्यांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये बहाल करण्यात आले. 

 

डॉ. बाबसाहेब अंबेडकर यांनी संविधान बनविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सोबतच समिती सदस्यांनी देखील पायाभरणी केली. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आज काहिंनाच फक्त त्यांची संविधानातील काही कलमे, अधिकार, कर्तव्ये माहित आहेत. परंतु आपले हक्क, अधीकार नेमके कोणते हे प्रत्येक नागरिकाला माहित असणे खूप गरजेचे आहे.  

 

आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. सोबतच समिती सदस्यांनी सुद्धा अथक परिश्रम घेतले. 

 

संविधानाचा जन्म 

 

देशावर १५० राज्य करुन ब्रिटीश राजवट मावळत होती. अशावेळी देशात राहणाऱ्या सर्व धर्मीयांमध्ये एकता, समानता टिकवून ठेवेल अशा संविधानाची भारताला गरज होती. देश एकसंध व्हावा आणि जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व हक्क मिळावेत याचा विचार सुरु होता. देश स्वतंत्र होत असताना संविधान सभेच्या स्थापनेची मागणी जोर धरू लागली.

 

या विधानसभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत २०७ सदस्य उपस्थित होते. संविधान सभा स्थापन झाली तेव्हा या विधानसभेत ३८९ सदस्य होते पण नंतर त्यांची संख्या २९९ पर्यंत कमी झाली. स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाली तेव्हा काही संस्थानं या विधानसभेचा भाग नव्हती आणि त्यामुळे सदस्य संख्यादेखील कमी झाली.

 

या संविधानाद्वारे देशातील नागरिकांमध्ये विश्वास आणि सहकार्याची भावना निर्माण केली जाते.

खरंतर, सरकार कसे स्थापन केले जाते, निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला असेल, हे संविधानाच स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारच्या अधिकारांची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. तसेच नागरिकांचे अधिकार काय आहेत हे संविधानात स्पष्ट करण्यात आलं आहे. श्रेष्ठ समाज निर्मितीसाठी लोकांच्या इच्छा, आकांक्षा संविधानात नमूद करण्यात आल्या आहेत. संविधानामुळे नागरिकाला एक सुखकर, अधिकाराचे जीवन प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे आज कोणतीही व्यक्ती मुक्तपणे संचार करू शकते.

कुठे कुठे संविधानाच्या विरोधात, गैर व्यवहार करून अवैधरित्या कामकाज चालवले जाते. त्याला वाचा फोडण्यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून संविधानिकरित्या त्याच्या हक्कासाठी तक्रार नोंदवू शकते. त्यावर एकच उपाय म्हणजे संविधान. त्यामुळे प्रत्येक नागरिक कोणत्याही कचाट्यात सापडल्यास जे शेवटी कायद्याच्या चौकटीतील व्यक्तीला हक्काची पायवाट दाखवते ते म्हणजे आपले भारतीय संविधान. आणि म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाने अवश्य वाचावे असे बहुमूल्य भारतीय संविधान. चला तर, संविधान वाचूया देश घडवूया !

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts