भारतात कोव्हिशील्डची निर्मिती करण्यासाठी भारताला आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा तातडीने पुरवठा करण्याचा महत्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. यामुळे भारतात कोव्हिशील्ड लशीची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता होऊ शकणारआहे. यामुळे कोविड रुग्णांबरोबरच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांसाठी या लशीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकेल असे अमेरिकेला वाटत आहे.
कोविडशी लढा देण्यासाठी आवश्यक असलेली औषधे, रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट, व्हेंटिलेटर्स आणि पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट्सचा (पीपीई) पुरवठा करण्याचा महत्वाचा निर्णय अमरिकेने घेतला आहे.
देशात करोनाचा उद्रेक झाला असून भारताच्या करोनाविरोधातील या लढाईत आता अमेरिकेने मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात वेळेत मोठ्या प्रमाणावर लशीची निर्मिती व्हावी यासाठी अमेरिका लस निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल तातडीने भारताला देणार आहे.
अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवन यांनी फोनद्वारे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. यावेळी भारतातील करोनाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना त्यांनी सहानुभुती व्यक्त केली. या महासाथीच्या काळात अमेरिका भारताच्या सोबत असल्याचे सुलीवन म्हणाले. भारत आणि अमेरिकेची गेल्या ७ दशकांपासून आरोग्य क्षेत्रात भागीदारी असून आता कोविडला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही देश असेच पुढे काम करत राहतील असा विश्वास सुलीवन यांनी व्यक्त केला आहे.
Just as India sent assistance to the United States as our hospitals were strained early in the pandemic, we are determined to help India in its time of need. https://t.co/SzWRj0eP3y
— President Biden (@POTUS) April 25, 2021
भारताला ऑक्सिजन पुरवठ्यावरही अमेरिका करणार मदत
भारताला आवश्यक असलेला अधिकाधिक ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल यावर देखील अमेरिका तातडीने मार्ग शोधत आहे. याबरोबरच अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (डीएफसी) भारतात मोठ्या प्रमाणालर लस निर्मिती व्हावी यासाठी निधी देण्याचे पाऊल उचलले आहे. लस निर्मिती कंपनीने सन २०२२ पर्यंत १ बिलियन लशीचे डोस तयार करावे असा डीएफसीचा प्रयत्न आहे.