कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्ययंत्रणा कोलमडून गेली. त्यातच, तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा इशारा दिलाय.
कोव्हिड-19 ने देशभरात हा:हाकार माजवलाय. ही लाट नाही, त्सुनामी आहे. या शब्दात डॉक्टर परिस्थितीचं वर्णन करतायत. देशात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गाने विक्राळ रूप धारण केलंय.
“सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल,” महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी हा इशारा दिला आहे.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट कधी येईल?
संसर्गाच्या लाटा (वेव्ह) येत असतात. कोरोना संसर्गाच्या चार ते पाच लाटा येतील. अमेरिकेतील मिशिगन आणि फ्रान्समध्येही संसर्गाची चौथी लाट आलीये. त्यामुळे, तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि तीव्रता कशी कमी करता येईल. याकडे लक्ष दिलं पाहिजे.
तिसऱ्या लाटेचा प्रभाव किती गंभीर असेल हे पाहावं लागेल. याचं कारण, व्हायरस म्युटेट (बदलत) होत राहणार. महाराष्ट्रात डबल म्युटंट, तर बंगालमध्ये ट्रिपल म्युटंट आढळून आलाय
ही लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर असण्याची शक्यता आहे. पण, दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल असा अंदाज आहे.
तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. एक जीव वाचवणं आणि दुसरं, रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती न येऊ देणं. घरच्या-घरीच सौम्य रुग्णांवर उपचार तिसऱ्या लाटेत पहिलं ध्येय आहे.
घाबरु नका, लसिकरणामुळे कोरोनाचा धोका होणार कमी.
सप्टेंबरपर्यंत आपण 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण करू शकणार नाही. त्यामुळे, आपली प्राथमिकता 60 ते 90 वर्षं वयोगटातील 80 टक्के लोकांचं लसीकरण असली पाहिजे.सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत जेवढ्या लोकाचं लसीकरण होईल. त्यावरून, तिसऱ्या लाटेची तीव्रता किती कमी होईल हे समजू शकेल. लशीमुळे आजाराची तीव्रता कमी होऊन, मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.हर्ड इम्युनिटी निर्माण होण्यासाठी 80 टक्के लोकांचं लसीकरण करावं लागेल.
राज्यातून दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीला ओसरण्यास सुरू होईल. मुंबईत लाट थोडी कमी झाली असेल. पण, लाट ओसरणं लोकांवर अवलंबून आहे. लोकांनी मास्क घालायला पाहिजे.