सहसा, बहुतेक लोक घरातील कामे करणे टाळतात. घराची स्वच्छता करणं अनेकांना कंटाळवाणे काम वाटतं. बहुतेक ठिकाणी घराची स्वच्छता महिलांच्या माथी मारलेली असते.स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी कोणी रोजच्या रुटीनमध्ये जिम करतो, कोणी पोहणं किंवा बॅडमिंटनसारखे व्यायाम करतात. मात्र, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा आणखी सोपा उपाय म्हणजे घराची नियमित साफसफाई (House Cleaning) करणं. ही गोष्ट जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. घरातील कामे केल्यानं शरीर भरपूर कॅलरीज बर्न (Calories Burn) करतं, ज्यामुळे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
तुम्ही साफसफाई करताना ज्या कॅलरी बर्न करता त्या तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला स्वच्छता आवडत असेल, पण व्यायाम करायला आवडत नसेल तर घरातील स्वच्छतेची काम करणे तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरू शकते. घर स्वच्छ असल्याने घरातील सगळ्यांचा मूड देखील चांगला राहतो.
द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बिहेवियर चेंज कंपनी नूमने दोन हजार प्रौढांवर केलेल्या अभ्यासात रंजक माहिती समोर आली आहे. घराशी संबंधित कामे आणि आपल्या फिटनेसबद्दल अभ्यास काय सांगतो ते जाणून घेऊया.
आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा घर स्वच्छ करणाऱ्या व्यक्ती वर्षातून साधारण ३० तास साफसफाईसाठी वेळ खर्च करतात. हा अवधी एका दिवसापेक्षा जास्त आहे. यामुळे त्यांच्या ९२७७ कॅलरीज बर्न होतील. त्याचप्रमाणे, जे प्रौढ व्यक्ती आठवड्यातून एकदा बागकामासाठी ३८ मिनिटे देतात आणि या काळात ते माती उलटवून टाकण्याचे काम करतात तेव्हा त्यांच्या १४२कॅलरीज बर्न होतात.
घराच्या साफसफाईच्या वेळी फरशी पुसण्याचे काम हा एक उत्तम व्यायाम आहे. अभ्यासात सहभागी असलेले लोक जे आठवड्यातून ४ वेळा घर पुसण्याचे (पोछा करणे) काम करत होते, ते या प्रक्रियेद्वारे दरवर्षी त्यांच्या ८७४७ कॅलरीज बर्न करतात.
घराची साफसफाई ठेवी शरीर निरोगी :
घराची साफसफाई करून शरीरातील फक्त कॅलरीज जळतात असं नाही. अभ्यासात सामील असलेल्या साठ टक्के लोकांमध्ये स्वच्छतेचे इतर फायदे देखील आढळले. घराच्या स्वच्छतेमुळे नंतर आराम वाटतो. ५९ टक्के लोकांना असे वाटले की, स्वयंपाकघर स्वच्छ केल्याने त्यांची जीवनशैली निरोगी झाली आहे. ज्या प्रौढांना घर साफ करायला आवडतं त्यांच्यातील ७७ टक्के लोकांनी सांगितले की, स्वच्छता पूर्ण झाल्याने मूड चांगला होतो, तर अर्ध्याहून अधिक लोकांनी सांगितले की त्यांना घर साफ करणे आवडते. याशिवाय घराची नियमित साफसफाई केल्याने चांगली झोप, व्यायामातून मिळणारे फायदे मिळतात.
अहो मग वाट कसली पाहताय, घ्या आपल्या हाती झाडू आणि करा मिशन आरोग्याचे सुरू.काही फायदा होईल नाही तर घरच्या गृहिणी तुमचे फार कौतुक चार चौघात तर नक्की करतील. अश्याच fitness news साठी मराठी Shout या आपल्या हक्काच्या साईट ला भेट देत रहा आणि निरोगी आयुष्य जगत रहा.