गौराई किंवा महालक्ष्मी अशी ओळख असणाऱ्या देवीला विदर्भात किंवा अख्या महाराष्ट्रात खुप मानाचे स्थान आहे. दरवर्षी त्यांचे आगमन, पूजन, सेवा आणि निरोप समारंभ हा द्वीगुणित करणारा सोहळाच असतो. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. एका पौराणिक कथेनुसार, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. त्यानंतर तिची प्रार्थना केली. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते. गौराईची अनेक रूपं मनात ठसतात. गौरी आवाहनाला गौरीचं घरोघरी होणारं आगमन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा ठरतो. गौरीपूजनाच्या वेळी केली जाणारी गौरीची आरास, सजावट, भरला जाणारा ओवसा, गौरीचा नैवेद्य, खेळल्या जाणार्या फुगड्या व गाणी पाहता गौराईच्या स्वागताला सगळ्यांच्याच आनंदाचे भरते येते. तर आज आपण त्यांची स्थापना आणि वेगवेगळ्या भागातील प्रथा परंपरा आजच्या लेखातून जाणुन घेणार आहोत. सुरूवात करूयात त्यांच्या स्थापने पासून.
गौराईंची स्थापना
वेगवेगळया भागातील वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळया चालीरीती अनुसरून काही थोड्या मोठ्या फरकाने हा उत्त्सव साजरा केला जातो. यातील पहिली गोष्ट म्हणजे, आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत. हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे. आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणावेत. गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना करावी. अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे, असे संबोधतात.
वेगवेगळया पद्धती
१) महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे. काही ठिकाणी गौरींचे नुसते मुखवटे असतात, तर काही कुटुंबांमध्ये पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकारा खडे आणून त्यांची पूजा केली जाते. त्याला खड्यांच्या गौरी म्हणतात.
२) काही भागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात आणि उतरंडीला साडी-चोळी नेसवून त्याची पूजा करतात.
३) काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात. म्हणजेच घरातील गहू, तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे.
४) विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी महालक्ष्मींचे मुखवटे ठेवले जातात. विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात.
५) काही ठिकाणी तेरड्याची गौर असते. यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात आणि मुळं म्हणजेच गौरींची पावले असे म्हटले जाते.
६) आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी किंवा महालक्ष्मी येतात.
७) आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी वा महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. काही ठिकाणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजन केले जाते. काही ठिकाणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.