“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” हे वाक्य शालेय जीवनापासून आपण ऐकत आलोत. हे वाक्य काही साधारण नाहीच मुळी. कारण आज याच वाक्याचे पडसाद आधुनिक काळात फार चांगल्या प्रकारे उमटत आहेत. खरंतर आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. अर्थात ज्या व्यक्तीने आपल्या देशासाठी रात्रंदिवस शैक्षणिक, मानसिक, सामाजिक, अर्थिक, राजकिय आणि कित्येक क्षेत्रात समर्पण दिलंय समाज परिवर्तन करून ज्यांनी दलितांना न्याय मिळवुन दिला ती महान व्यक्ती म्हणजे जगप्रसिध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कित्येक दलितांसाठी झटून ज्यांनी मोठा संघर्ष केला असे भीमराव रामजी आंबेडकर. हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात. आज डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती. मात्र आजही तळागाळातील लोकांच्या तोंडावर बाबासाहेबांचे नाव का आहे? त्यांचे महान कार्य तुम्हाला माहीतीये का ? आजही प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांना का मानलं जात ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज या लेखातून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. चला तर आज त्यांच्या जयंतीनिमित्त या खास लेखातून त्यांची कारकीर्द जाणून घेऊयात.
Table of Contents
- बाबासाहेबांचा जन्म | Birthplace of Babsaheb Ambedkar
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती | Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi
- बाबासाहेबांचे सुरुवातीचे शिक्षण आणि उच्च शिक्षण | Dr. Babasaheb Ambekdar Education & Degree
- बाबासाहेबांचे कार्य का महान आहेत ? जाणून घ्या | Dr. Babasaheb Ambedkar Social Work
- बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान, साजरे केले जाणारे दीन. | Dr. Babasaheb Ambedkar Achievmnet & Awards
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकं | Dr. Babasaheb Ambedkar Written Books List
बाबासाहेबांचा जन्म | Birthplace of Babsaheb Ambedkar
लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ साली महू गावात झाला.
आडनावाचे रूपांतर असे झाल
साताऱ्याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे बाबासाहेबांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे ‘आंबेडकर’ असे झाले. नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती | Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi
नाव |
भीमराव रामजी आंबेडकर |
जन्म |
१४ एप्रिल, १८९१ |
जन्मस्थान |
महू, मध्य प्रदेश |
पत्नी |
१. रमाबाई आंबेडकर (१९०६-१९३५) २. सविता आंबेडकर (१९४८-१९५६) |
वडील |
रामजी आंबेडकर |
आई |
भीमाबाई सकपाल |
मुलगा |
यशवंत आंबेडकर |
नातू |
प्रकाश यशवंत आंबेडकर |
मृत्यू |
६ डिसेंबर १९५६ |
बाबासाहेबांचे सुरुवातीचे शिक्षण आणि उच्च शिक्षण | Dr. Babasaheb Ambekdar Education & Degree
मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. परंतू इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. त्यावेळी बाबासाहेब इ.स. १९०७ साली एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.
३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी बाबासाहेबांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि लगेच बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. परंतू पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले. आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२७] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या. पुढे जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.
बाबासाहेब हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. यानंतर आंबेडकरांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन १९१३ मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील ते पहिले विद्यार्थी होते. एवढेच नाही तर पुढे कोलंबिया शहरातील विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. पुढे त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. एम.ए. च्या पदवीसाठी बाबासाहेबांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले. आणि पुढे ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली. पुढे बाबासाहेबांनी बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला. ३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला. आणि मुख्य म्हणजे बाबासाहेब इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला. यानंतर बाबासाहेब १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. आणि उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार :
बाबासाहेबांनी जातीसंस्था विषयक मांडलेले सिद्धांत काय सांगतात ?
बाबासाहेबांच्या मते,
वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.
जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कुळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडीलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.
बाबासाहेबांचे कार्य का महान आहेत ? जाणून घ्या | Dr. Babasaheb Ambedkar Social Work
१) भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल होते.
२) २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदन सादर केले.
३) ‘मूकनायक’ पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा फोडली. व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. कारण अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.
४) १९२० मध्ये आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले होते.
५) बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता.
६) २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकरांनी कोरेगाव येथील विजयस्तंबास भेट दिली होती. तसेच तेथील दलितांना समर्थन दिले होते.
७) २० मार्च १९२७ मध्ये आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले.
८) ३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला.
९) मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली. तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक ‘मनुस्मृती दहन दिन’ आयोजित करतात.
१०) आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले होते.
११) १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की,
मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही! असे त्यांचे म्हणणे होते.
१२) महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी ‘हरिजन’ ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ ‘ईश्वराची लेकरे’ असा होतो. तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये ‘हरिजन’ नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “अस्पृश्य हे ‘हरिजन’ असतील तर उरलेले लोक ‘दैत्यजन’ आहेत काय?” असा सवाल करत बाबासाहेबांनी ‘हरिजन’ हा शब्दाला विरोध केला होता.
१३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती.
१४) दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून डॉ. बाबासाहेब यांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.
१५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी संघर्ष केला होता.
१६) भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते. अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून दिले. गोलमेज परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.
१७) दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली होती.
१८) तिसऱ्या गोलमेज परिषदेसाठी परदेश दौरा. “ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा.” त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली होती.
१९) डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला होता. त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली होती.
२०) बाबासाहेब आंबेडकर हे राजनितीतज्ज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले.
२१) आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत.
२२) कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली होती.
२३) १४ जून १९२८ रोजी डॉ. आंबेडकर यांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली होती. कारण दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते.
२४) अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती.
२५) बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या आणि अनेकांना त्याचा लाभ मिळाला.
२६) १९३५ साली जेव्हा भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली तेव्हा भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला होता.
२७) कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेऊन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली होती.
२८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते
२९) बाबासाहेब आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले होते.
३०) हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता.
३१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले होते.
३२) महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.
३३) बाबासाहेब आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी भाषा, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या होत्या.
३४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रभावी पत्रकार व संपादक होते, वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली
बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान, साजरे केले जाणारे दीन. | Dr. Babasaheb Ambedkar Achievmnet & Awards
१) भारतरत्न : सन १९९० मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर “भारतरत्न” हा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२) डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) : ही सन्माननीय पदवी ५ जून १९५२ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने प्रदान केली होती.
३) डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट.) : ही सन्माननीय पदवी १२ जानेवारी १९५३ रोजी तेलंगाणा राज्यातील हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाने प्रदान केली होती.
४) इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना ‘बोधिसत्व’ ही उपाधी प्रदान केली होती.
५) भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.
६) इ.स. १९९० मध्ये, भारत सरकारने आंबेडकरांची १०० वी जयंती साजरी करण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ ₹१ चे नाणे काढले होते.
७) आंबेडकरांची १२५व्या जयंतीच्या निमित्ताने ₹१० आणि ₹१२५ ची नाणी २०१५ मध्ये काढले गेले होते. या सर्व नाण्यांवर एका बाजूला आंबेडकरांचे चित्र कोरलेले होते.
८) मंत्रालय (महाराष्ट्र) : मंत्रालयाच्या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र व त्यासोबत संविधान प्रस्ताविकेचे अनावरण ९ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.
९) सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची ‘द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम’ नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे.
१०) महाराष्ट्रात आंबेडकरांची जयंती “ज्ञान दिन” म्हणून साजरी केली जाते. आंबेडकरांना ‘ज्ञानाचे प्रतीक’ मानले जाते. महाराष्ट्र शासनाने इ.स. २०१७ मध्ये आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.
११) आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला होता.
१२) आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडचा सत्याग्रह केला होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून साजरा केला जातो.
१३) आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे ‘बौद्ध धर्म’ स्वीकारला होता व तसेच लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्यांच्या या कृतीमुळे बौद्ध धर्माचे प्रवर्तन झाले त्यामुळे ‘अशोक विजयादशमी’ किंवा १४ ऑक्टोबर हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
१४) आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे जाहिरपणे दहन केले होते. त्यामुळे ‘२५ डिसेंबर’ हा दिवस ‘मनुस्मृती दहन दिन’ म्हणून पाळला जातो.
१५) आंबेडकरांच्या सन्मानार्थ ५ जुलै हा दिवस ‘लॉयर्स डे’ (वकील दिन) म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी ५ जुलै १९२३ रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकं | Dr. Babasaheb Ambedkar Written Books List
१) Castes in India : Their Machanism, Genesis and Development ( भारतातील जातिसंस्था तिची यंत्रणा उत्पत्ती आणि विकास) १९१६
२) The National Dividend of India a Historical and Analytical Study (ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती) १९१६
३) Federation Versus Freedom (संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) २९ जानेवारी १९३९
४) The Problem of the Rupee – Its Origin and its Solution(रुपयाचा प्रश्न – उद्गम आणि उपाय) १९२२
५) Pakistan or The Partition of India(पाकिस्तान अथवा भारताची फाळणी) १९४५
६) Annihilation of Castes (जातीचे निर्मूलन) १९३६
७) Ranade, Gandhi And Jinnah (रानडे गांधी आणि जिन्ना) १८ जानेवारी १९४२
८) Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables (गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती) १९४२
९) Communal Deadlock and a Way to Solve it (जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग) १९४५
१०) What Congress and Gandhi have done to the Untouchables (काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?) १९४५
११) States and Minorities- What are their rights and how to secure them in the constitution Free India(संस्थाने आणि अल्पसंख्याक) १९४७
१२) Maharashtra as a Linguistic Province (महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत) १९४८
१३) The rise and fall of Hindu Women (हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती) १९६५
१४) Who were the Shudras? How they came to be the Fourth Varna in Indo-Aryan Varna Society(शुद्र पूर्वी कोण होते?) १९४६
१५) The Riddles in Hinduism (हिंदू धर्मातील कोडे)
१६) Thoughts on Linguistic States (भाषिक राज्यासंबंधी विचार)
१७) The Pali Grammar, Dictionary and Bouddha Pooja Patha(पाली व्याकरण, शब्दकोश आणि बौद्ध पुजापाठ) १९९८
१८) Revolution and Counter-Revolution (क्रांती आणि प्रतिक्रांती)
१९) Buddhism and Communism(बौद्धधम्म आणि साम्यवाद) १९५६
२०) The Buddha and His Dhamma(भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म)
FAQ | बाबासाहेब संबंधित प्रश्ने आणि उत्तरे
उत्तर : सन १९९० मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर “भारतरत्न” हा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
उत्तर :आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडचा सत्याग्रह केला होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून साजरा केला जातो.
उत्तर : १४ जून १९२८ रोजी डॉ. आंबेडकर यांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली होती. कारण दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते.
उत्तर : लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ साली महू गावात झाला.
उत्तर : आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले.
संकलन आणि लेखन :
प्रिया गोमाशे