आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर संतांनी, महात्म्यांनी अनेक सामजिक कार्य केलेत. चळवळी राबवल्या, वेगवेगळ्या वळणातून समाजाला चालना दिली. काहींनी आपल्या प्राणाची आहुती देखील दिली. तर काही थोरा मोठ्यांची पुण्याई म्हणून समाज प्रगतिशील बनवले. अश्याच एका आगळ्या वेगळ्या पण प्रसिद्ध अश्या व्यक्तीची जीवनगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांना आपण सगळेच ‘महात्मा फुले’ या लोकप्रिय नावाने ओळखतो. खरंतर महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक हे त्यांचे आद्य कार्य. आणि एवढेच नाही तर अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. अश्या थोर महात्म्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम बघुयात त्यांचा जन्म.
Table of contents
महात्मा फुले यांचा जन्म | Birthplace of Jyotirao Phule
जोतीराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.
महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती, ही गोष्ट इतिहासाच्या काळात घडली. परंतु आज त्याचे चांगले परिणाम म्हणजे अधूनिक शिक्षण. तेव्हा जोतिबांनी खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यावेळी शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची आजही मात्र तशीच कणखर ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी सन्माननीय महात्मा (संस्कृत: “महान आत्मा”, “पूज्य”) पदवी प्रदान केली होती.
खरंतर आपल्या महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे देखील म्हणतात.
प्रसिद्ध असा ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा महात्मा फुले यांचाच प्रसिद्ध ग्रंथ. त्यावेळी तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. मात्र आजही त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
Jyotirao Phule Information In Marathi
नाव | जोतीराव फुले |
जन्म | ११ एप्रिल १८२७ |
जन्मस्थान | कटगुण, सातारा , महाराष्ट्र |
वडिलांचे नाव | गोविंदराव शेरीबा फुले |
आईचे नाव | चिमणाबाई फुले |
पत्नी | सावित्रीबाई फुले |
संघटना | सत्यशोधक समाज |
चळवळ | मुलींची पहिली शाळा सुरु करणे |
मृत्यू | २८ नोव्हेंबर, १८९० (वय ६३) |
प्रमुख स्मारक | भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे |
बालपण आणि शिक्षण | Jyotirao Phule Education
खरंतर जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
जोतीरावांचा स्वभाव म्हणजे एकंदरीत ते करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा ‘बीजमती’ हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली आणि कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ देखील झाले होते. त्यातील एक “नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद “
शैक्षणिक कार्य :
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
त्यावेळी जोतिबांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.
पुढे महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण-सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली होती. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधनेनी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. आणि त्यामुळे त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला होता.
सामाजिक कार्य आणि विचार प्रबोधन | Jyotiba Phule Social Work
संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. ‘कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो’, असे त्यांचे मत होते.
सर्व गावाच्या, प्रांताच्या, देशाच्या, खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे.
आपणां सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे.
आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री – पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला ‘सत्यवर्तन करणारा’ म्हणावे.
आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री – पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही, त्याप्रमाणे जबरी न करणाऱ्या सत्यवर्तन करणारे म्हणावे.
स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदांस, आपल्या सोयऱ्याधायऱ्यांस आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत, आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात, परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत, याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे. ‘अखंड’ या काव्यप्रकारात त्यांनी ‘मानवाचा धर्म’, आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णुता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इत्यादी.
गोष्टींवरही भाष्य केले आहे. ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला; त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला.
आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजाचा आवाज ही हिंदुस्थानात अनेक शतके दडपून टाकलेल्या कनिष्ठ समाजाची किंकाळी होय.
वेद हे ईश्वरनिर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत, असे जोतीरावांचे ठाम मत होते. वेदाने समाजात भेद पडले . म्हणून वेद म्हणजे भेद असे त्यांना वाटे. ब्राह्मणांच्या पोथीतील जातींच्या उत्पत्तीविषयीची कल्पना त्यांना मुळीच मान्य नव्हती. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय बाहुतून जन्मले, शूद्र त्याच्या पायातून निघाले हे विधान त्यांना भयंकर आणि धादांत असत्या वाटे. “मनुस्मृती” ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसविते म्हणून ती अपवित्र आहे, असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला आहे. बुद्धाविषयी जोतिरावांना नितांत आदर वाटे. महाराष्ट्रातील संत कवींचा जोतीरावांनी धिक्कार केला आहे. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, रामदास यांनी ब्राह्मणांच्या दुष्टाकर्मांचा उघड रीतीने त्याग करण्याचे धैर्य दाखविले नाही. समाजातील ब्राह्मणांचे वर्चस्व राहण्यासाठी ह्या महाराष्ट्र संत कवींनी साह्य केले, असा जोतीरावांनी निष्कर्ष काढला आहे.
सत्यशोधक समाज | Satyashodhak Samaj
२४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन-प्रकाशनचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मराठीतही मंगलाष्टके रचली गेली.
ज्योतिबा फुले यांचा मृत्यू
महात्मा ज्योतिबा आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे शेवटी सरकारने कृषी कायदा संमत केला गेला. धर्म, समाज आणि परंपरा यांचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली जी आपण बघितली, शेवटी, २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे निधन झाले. आणि सर्वत्र शोककळा पसरली.
लेखन साहित्यावर प्रकाश
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जाई. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. आता बघुयात त्यांचे लेखन कार्य.
१) इ.स.१८५५ (नाटक) तृतीय रत्न
२) जून, इ.स. १८६९ (पोवाडा) छत्रपती – शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
३) जून इ.स. (१८६९) (पोवाडा) -विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
४) इ.स.१८६९ (पुस्तक) ब्राह्मणांचे कसब
५) इ.स.१८७३. (पुस्तक) गुलामगिरी
६) सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ (अहवाल) – सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत
७) मार्च २० इ.स. १८७७ (अहवाल) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
८) एप्रिल १२ , इ.स. १८८९ (निबंध) पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
९) २४ मे इ.स. १८७७ (पत्रक) दुष्काळविषयक पत्रक
१०) १९ ऑक्टोबर इ.स. १८८२ (निवेदन) हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
११) १८ जुलै इ.स. १८८३ (पुस्तक) शेतकऱ्याचा असूड
१२) ४ डिसेंबर इ.स. १८८४ (निबंध) महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत
१३) ११ जून इ.स. १८८५ (पत्र) मराठी ग्रंथागार सभेस पत्र
१४) १३ जून इ.स. १८८५ (पुस्तक) सत्सार अंक १
१५) ऑक्टोंबर इ.स. १८८५ (पुस्तक) सत्सार अंक २
१६) १ ऑक्टोंबर इ.स. १८८५ (पुस्तक) – इशारा
१७) २९ मार्च इ.स.१८८६ (जाहीर प्रकटन) ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर
१८) २ जून इ.स. १८८६ (पत्र) मामा परमानंद यांस पत्र
१९) जून इ.स. १८८७ (पुस्तक) सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी
२०) इ.स. १८८७ (काव्यरचना) अखंडादी काव्य रचना.
२१) १० जुलै इ.स. १८८७ (मृत्युपत्र) महात्मा फुले यांचे उईलपत्र
२२) इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक.
उत्तर: जोतीराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.
उत्तर: सावित्रीबाई फुले
उत्तर: २४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
उत्तर: जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली.
उत्तर: ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
लेखन आणि संकलन
प्रिया गोमाशे