ओस्लो: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन लागू केला आहे. त्याशिवाय भारतासह काही देशांमध्ये करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग, मास्क वापरण्याबाबतचे नियम सक्तीचे केले आहेत. मात्र, अनेकजण या नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसून येते. मात्र, लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चक्क पंतप्रधानांनाच पोलिसांनी दंड ठोठावला.
काय होते नेमके कारण:
नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी फेब्रुवारी महिन्यात आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी एका छोटेखानी पार्टीमध्ये १३ जण उपस्थित होते. मात्र, नियमांनुसार १० जणांना परवानगी देण्यात आली होती.सोलबर्ग यांना २० हजार नॉर्वे क्राउन्स म्हणजे जवळपास एक लाख ७५ हजार ६४८ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी एका माउंटन रिसॉर्टवर पार्टी आयोजित केली होती. त्यावरून त्यांच्यावर देशभरातून टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली. त्या दरम्यान नॉर्वेत १० हून अधिकजणांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई केली जात नाही. मात्र, पंतप्रधान ह्या लॉकडाउनचा निर्णय घेणाऱ्या सरकारच्या प्रमुख आहेत. त्यांनीच नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड वसूल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.सर्वांसाठी कायदा समान असून कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी देशाची माफी मागितली असून दंड भरण्याची तयारी दर्शवली आहे.
आपल्या भारतात करोनाचा संसर्ग फैलावत असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून गर्दी जमवली जात असल्याचे चित्र आहे. यामध्ये महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, भारताबाहेर काहीसे वेगळे चित्र आहे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चक्क पंतप्रधानांनाच दंड ठोठावण्यात आला असल्याने ,आपल्या भारतीय लोकांनी आणि राजकीय व्यक्तींनी या प्रकरणातून बोध घेणे गरजेचे आहे.