अनेक घरांमध्ये वर्षभरासाठी गहू, तांदूळ किंवा अन्य कोणत्याही धान्यांची साठवणूक केली जाते. मात्र कोणत्याही धान्याचा साठा करुन ठेवायचा असेल तर त्याची विशेष काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. अनेक वेळा वातावरणातील बदल किंवा धान्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे धान्य खराब होतं. त्यांच्यात किड लागते किंवा मग बुरशी लागणे या सारख्या समस्या निर्माण होतात. मात्र धान्याची योग्य ती काळजी घेतल्यानंतर या समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे अशा काही घरगुती टिप्स आहेत,ज्यांच्यामुळे धान्यांना लागणाऱ्या कीडपासून आपण त्याचं संरक्षण करु शकतो. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स ज्यामुळे आपण साठवलेल्या धान्याला किंवा डाळीला कीड आणि आळ्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही.
How to get rid of nasty weevils or grain beetles from your spices and grains
१) कडुलिंब –
बहुगुणी कडुलिंबाच्या पानांचा वापर करुन आपण धान्याला लागणारी कीड थांबवू शकतो. यासाठी कडुलिंबाची पाने सावलीमध्ये वाळवून घ्यावीत. त्यानंतर ही १० ते १५ पानं एका झिपलॉक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरावीत.त्यानंतर या पिशवीला लहान लहान छिद्र पाडावीत आणि ही पिशवी धान्याच्या गोण्यांमध्ये किंवा साठवणुकीच्या डब्यात ठेवावी. पिशवीला छिद्र पाडल्यामुळे कडुलिंबाच्या पानांचा वास धान्यांमध्ये दरवळतो, त्यामुळे या कडुलिंबाच्या तीव्र वासामुळे धान्यांना कीड लागत नाही.
२) लसूण –
लसणामुळेदेखील धान्यांना कीड लागत नाही. त्यासाठी लसणाची सालं न काढता एक संपूर्ण गड्डी धान्यामध्ये टाकावी. प्रथम डब्यात धान्य टाकावे त्यावर लसणाची एक गड्डी आणि त्यावर पुन्हा धान्य असे थर डब्यात ठेवावेत. त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. तसंच डब्याचं झाकणं हे हवा बंद असावं याकडे लक्ष द्यावे.
३) लाल मिरच्या –
लाल मिरच्यांचाही वापर आळ्यांचा प्रादुर्भाव रोखू शकतात. यामध्ये लसणाप्रमाणेच कृती करायची आहे. केवळ लसणाच्या ऐवजी आपल्याला प्रत्येक थराला ४ ते ५ लाल सुकलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत ही पद्धत देखील अत्यंत प्रभावी आहे यामुळे आपल्या गहू, तांदूळ किंवा डाळी मध्ये देखील किडे आणि आळी होणार नाहीत.
४) लवंग –
या पद्धतीमध्ये कडुलिंबाची वाळवलेली पाने आणि लसूण समप्रमाणात घेऊन त्यामध्ये १० ते १५ लवंगा टाकाव्यात. त्यानंतर मिक्समध्ये थोडं पाणी टाकून हे पदार्थ बारीक वाटून घ्यावेत. त्यानंतर तयार मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या गोळ्या बनवाव्यात आणि यांना दोन दिवस सूर्य प्रकाशात सुकवाव्यात. यानंतर तयार झालेल्या गोळ्या कोणत्याही पातळ कपड्यात प्रत्येकी एक बांधून धान्यात ठेवाव्यात ज्यामुळे गोळ्या मोडल्या किंवा त्यांचा चुरा झाला तरी आपल्या धान्यात मिक्स होणार नाही आणि आपले धान्य किडे आणि आळ्या पासून सुरक्षित देखील राहील.
५) पुदिन्याची पाने –
पुदिन्याची पाने ही उग्र वासाची असतात त्यामुळे कोणतेही कीटक किंवा अळ्या धान्याला लागत नाही. यामध्ये पुदिन्याची १० ते १५ पाने उन्हात वाळवा. प्रथम खलच्या तळाला पुदिन्याची पाने पसरवून टाका. नंतर तांदूळ टाका पुन्हा त्यात पुदिन्याची काही पाने मिक्स करा. हि पद्धत वापरल्यास धान्याला कीड लागत नाही.