लॉकडाउन काळात दुरावलेले मित्र एकत्र येत जपत आहेत सामाजिक बांधिलकी
चंद्रपूर : कोरोना विषाणूने लॉकडाउन लागले. यामुळे अनेकांनी घरची वाट धरली. पुणे, मुंबईत मोठ्या पदांवर नोकरीवर असलेले घरी परतले. त्यातून दुरावलेले मित्र एकत्र आले. त्यांनी एकत्र येत नमस्ते चांदा क्लब स्थापन केले. याच क्लबच्या माध्यमातून दुरावलेल्या या बालमित्रांनी समाजचळवळ सुरू केली. दर रविवारी एकत्र येत वेगवेगळे उपक्रम हे बालमित्र राबवित आहेत.
मार्च महिन्यात कोरोना विषाणूने देशात हातपाय पसरले. प्रकोप वाढत गेल्याच्या पाश्र्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. लॉकडाउन काळात मोठ्यामोठ्या कंपन्यांची कामे ठप्प पडली. अनेकांना मवर्क फॉर होमफशिवाय पर्याय उरला नाही. लॉकडाउनचा काळ वाढत गेल्याने तेही काम बंद झाले. चंद्रपूर शहरातील पंधरा ते सोळा युवक नोकरीनिमित्त पुण्या, मुंबईत वास्तव्यास आहे. लॉकडाउनमुळे हे युवक स्वगावी परतले. घरच्या घरी राहून कंटाळलेल्या या युवकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ते एकत्रही आले. त्यातून नमस्ते चांदा क्लबची स्थापना केली. याच क्लबच्या माध्यमातून हे बालमित्र दर रविवारी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. याची सुरुवातच प्रदूषित चंद्रपुरात वृक्षारोपणाने झाली. भिवापूर वॉर्डात असलेल्या साईमंदिरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कडुqनब, गुलमोहर यासह अन्य झाडांचे रोपण केले. इतकेच नाही तर या झाडांचे संवर्धन करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. पुण्या, मुंबईत साफसफाईला महत्त्व दिले जाते. त्याच धरतीवर या युवकांनी रविवारी (ता. ३०) पठाणपुरागेट ते आरवट मार्गावरील प्लॉग रण मोहिमे अंतर्गत कच-याची साफसफाई केली. जवळपास पंधरा थैली कचरा गोळा केला. हा कचरा चंद्रपुरातील कचरा डेपोत आणून टाकला. यानंतरही वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा मानस या बालमित्रांनी व्यक्त केला. या क्लबमध्ये गोविल मेहरकुरे, हितेश कोटकर, प्रीतम खडसे, वैभव थोटे, मयुर निखारे, सागर महाडोळे, महेश सोमनाथे, अनिकेत सायरे, जगदिश राचलवार, यतीश मेश्राम, अभिजित इंगोले, चारूल कोटकर, गजराज आंबोरकर, प्रवीण पाटील, रोशन कोंकटवार, सिद्धार्थ नागरकर यांचा समावेश आहे.