राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची चर्चा काही दिवसांपूर्वी बघायला मिळाली. ह्रदयविकाराच्या झटक्याने काही दिवसांपासून आजारी अवस्थेत असलेले राजू श्रीवास्तव आज यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. मात्र ही घटना त्यांच्या फॅन्स लोकांसाठी काळजाचा ठोका चुकवणारी आहे. कॉमेडी क्षेत्रातील कॉमेडी किंग म्हणून ओळखल्या जाणारा राजू श्रीवास्तव यांनी मात्र अगदी कमी वेळात लोकांच्या मनावर कॉमेडीच्या हास्य शस्त्राने राज्य केले. खरंतर त्यांना लहानपणापासून नकलांचा नाद होता. आणि शेवटपर्यंत त्यांनी लोकांना हसवत ठेवलं. आज कॉमेडीच्या हास्यदर्दी रसिकांच्या मनावर राज्य करणारा हा विदुषी आज कायमचा पडद्याआड गेला. खरंतर त्यांच्या कॉमेडी जोक्स प्रमाणे त्यांचा जीवनप्रवास देखील रोचक आहे. चला तर मग आज बघुयात त्यांच्या आयुष्याचा जीवनप्रवास आणि काही खास किस्से.
त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ ला कानपूरला झाला. ते उत्तर प्रदेशातल्या उन्नाव भागातले होते. त्यांचं खरं नाव सत्यप्रकाश होतं. पण त्यांना राजू श्रीवास्तव नावानेच ओळखलं जायचं. लहानपणी शाळेत आणि त्यानंतर कॉलेजमध्ये त्यांनी अनेकांच्या नकला केल्या. त्यांचे वडील कवी उत्कृष्ट होते. राजू श्रीवास्तव यांनी शोले पाहिला आणि अमिताभ बच्चनचा राजूवर प्रचंड प्रभाव पडला. अमिताभने त्याच्यांवर अगदी गारूडच केलं. राजू त्यांच्यासारखे चालू लागले, बोलू लागले. तरीही त्याने पोट भरू शकतं याची त्यांना कल्पना नव्हती. परंतू लोकांना त्यांनी एक वेगळा अमिताभ बच्चन दाखवला हे मात्र नक्की.
परंतू जेव्हा पैशाची निकड भासायला लागली तेव्हा राजूचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. ते आईला पैसे मागायचे तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणायची की ‘स्वत: कमावशील तेव्हा कळेल.’ अमिताभ बच्चन यांची नक्कल केल्यावर त्यांना जेव्हा पैसै मिळू लागले तेव्हा हा व्यवसाय असल्याचं त्यांना जाणवलं. मग राजू विविध नेत्यांची नक्कल करू लागले. तरीही काही काळानंतर नकलाच किती करत राहणार असं त्यांना वाटलं आणि त्यातून एकपात्री प्रयोगांचा जन्म झाला.
१९८२ मध्ये ते मुंबईत गेले.१९८८ मध्ये त्यांनी तेजाब चित्रपटात काम केलं. त्यानंतर ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’ या चित्रपटातही भूमिका केल्या. २००५ मध्ये लाफ्टर चॅलेंज कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. त्यांनी साकार केलेलं गजोधर भैया हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. त्याचा इतका परिणाम झाला की राजू यांच्या आवाजतल्या कॅसेट्स तयार केल्या. एकदा राजू श्रीवास्तव ऑटोत जास्त असताना ऑटोवाला त्याची कॅसेट लावून हसत होता. इतकंच नाही तर राजू यांनाही ती कॅसेट ऐकण्याची शिफारस त्या ऑटोवाल्याने केली.
रिअलिटी शोमधली प्रसिद्धी तशी औटघटकेचीच असते. त्यानंतर बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्येही झळकले होते. २०१४ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आधी त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि मग ते भाजपात गेले.
राजू नेहमी हेच सांगायचे की, विनोदनिर्मिती करताना जितकं ओरिजिनल राहू तितकं चांगलं. द्वयर्थी विनोदाने काही वेळ आनंद वाटतो पण तो दीर्घकाळासाठी त्याचे परिणाम गंभीर होतात असं राजू यांचं मत होतं. आता राजू आपल्यात नाहीत. गेल्या बऱ्याच काळापासून राजू मुख्य प्रवाहात नव्हते. तरी त्याचं नाव आठवलं की चेहऱ्यावर हसू उमटायचं. आयुष्यभर लोकांना इतकं हसवणाऱ्या राजू यांनी आज पहिल्यांदाच चाहत्यांना रडवलं असेल. कारण गोष्टच काळजाला हात घालणारी आहे.
१० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती गंभीर असल्याने ते प्रदीर्घ काळ व्हेंटिलेटरवर होते. तेव्हादेखील अनेक सोशल मीडियावरून त्यांच्या फॅन्सच्या राजुंसाठी अनेक प्रतिक्रिया आणि प्रार्थना पाहायला मिळाल्या.
तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात माहिती दिली. जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली मात्र एन्जिओग्राफी नंतरही ते बेशुद्धच असल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार एन्जिओग्राफिमध्ये एका ठिकाणी १०० टक्के ब्लॉक सापडल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा पासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या आठ दिवसांपासून ते बेशुद्ध होते. आज त्यांची प्रकृती आधीपेक्षा चिंताजनक असून मेंदू जवळपास ‘डेड’ अवस्थेत पोहोचला होता आणि हार्टमध्येही समस्या होत्या.
हास्य प्रवास –
२००५ ची गोष्ट आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ नावाचा एक शो स्टार टीव्हीवर आला होता. हा काळ ओटीटीपूर्व होता. आपल्याला हवं तेव्हा हवा तो कार्यक्रम पहायचं प्रस्थ तेव्हापर्यंत नव्हतं. विविध क्षेत्रातले रिअलिटी शो तेव्हा आले होते. टीव्ही आणि असलंच तर इंटरनेट हे तेव्हा करमणुकीचं मुख्य माध्यम होतं.
‘स्टार वन’ या वाहिनीवर ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ नावाचा एक शो आला होता. आज जे स्टँड अप कॉमेडियनचं पीक आलं आहे त्याची पायाभरणी या शो मुळे झाली. स्टँड अप कॉमेडियनची स्पर्धा आणि त्यातून एक विजेता असा हा शो होता. समोर शेखर सुमन आणि नवज्योतसिंह सिद्धू परीक्षकाच्या भूमिकेत असायचे. वाक्या वाक्याला गडगडाटी हसणारा सिद्धू, कमनीय बांध्याची अँकर आणि तमाम हास्यवीर अशी ती जमून आलेली भट्टी होती. त्यातलाच एक होता राजू श्रीवास्तव
शिडशिडीत बांधा, गव्हाळ वर्ण, अजिबात हिरोपण नसलेला चेहरा, बिहारी तोंडवळ अशी ही आकृती माईक हातात घेतल्या क्षणापासून एकपात्री स्किटच्या माध्यमातून एक विश्व उभं करायचा. कधी ते लोकल ट्रेनचं असायचं, कधी लग्नाच्या सीनमधलं, कधी काही तर कधी काही. वाक्यांची फेक, किस्से, विविध पात्रांचे चेहरे तो लीलया उभे करायचा. त्यात नकला, कथा, प्रसंग सगळं असायचं. राजू यांच्या वाणीतून ते जग दिसायचं. खरंतर व्यक्ती गेल्यावर त्याचे मृत शरीर हे नाशवंत होते. परंतु त्याची कीर्ती मात्र आजीवन स्पूर्ती देत असते. असेच काहीसे राजू श्रीवास्तव कॉमेडी किंग हे जरी आपल्याला सोडून गेले तरी त्यांच्या कॉमेडीच्या कॅसेट्स, त्यांचे व्हिडिओज, आणि बरंच काही निखळ आनंद अविरतपणे आपल्याला देत राहतील हे मात्र नक्की. कॉमेडियन, कॉमेडी किंग राजु श्रीवास्तव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.