महाराष्ट्रात अनेक समाज सुधारक, महान व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. अनेक विविध चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि समाजाला यशाच्या शिखरावर पोहचवले. यात फक्त पुरुष मंडळीच नाही तर सामाजिक प्रबोधन चळवळीत स्त्रियांचा देखील मोठा वाटा आहे. आणि जेव्हा गोष्ट सावित्री बाई यांची येते तेव्हा अभिमानास्पद वाटते. शिक्षण, सामजिक चळवळी, स्त्रियांना योग्य न्याय, सन्मान, दर्जा आणि अस्पृश्यता नष्ट करण्यात या क्रांतिज्योतीने आपल्या प्राणाची फिकीर न करता, समाजात मोठे परिवर्तन घडवून आणले. चला तर आज आपण यांच्याच बहुमोल कार्याबाबत सखोल माहिती जाणून घेऊयात.
Table of contents
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन | Savitribai phule information in marathi
- सावित्रीबाई फुले यांचा जन्म | Savitribai Phule Birthplace
- सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण | Savitribai Phule Education
- सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आणि सामजिक कार्य | Savitribai Phule Social Work
- सावित्रीबाईंचा मृत्यू कसा झाला ?
- सावित्रीबाईंच्या कविता आणि इतर लेखन
- सावित्रीबाईंचा सत्कार
- सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन | Savitribai phule information in marathi
नाव | सावित्रीबाई फुले |
जन्म | ३ जानेवारी, इ.स. १८३१ |
उपमा | ज्ञानज्योती, क्रांतिज्योती |
जन्मस्थान | नायगाव, सातारा, महाराष्ट्र, भारत |
वडिलांचे नाव | खंडोजी नेवसे |
आईचे नाव | सत्यवती नेवसे |
पतीचे नाव | जोतीराव फुले |
अपत्ये | यशवंत फुले |
चळवळ | मुलींची पहिली शाळा सुरु करणे |
संघटना | सत्यशोधक समाज |
मृत्यू | मार्च १०, इ.स. १८९७, पुणे, महाराष्ट्र |
मृत्यूचे कारण | प्लेग |
प्रमुख स्मारक | जन्मभूमी नायगाव, सातारा, महाराष्ट्र |
खरंतर या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी असे देखील मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली होती. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म | Savitribai Phule Birthplace
भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला.
सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण | Savitribai Phule Education
सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आणि सामजिक कार्य | Savitribai Phule Social Work
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना “फुले” हे आडनाव मिळाले होते.
सावित्रीबाईंचे पती जोतीराव फुले यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. ही शाळा मात्र आजही पुण्यात पाहायला मिळते.
या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.
तेव्हा सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले होते. मनुवादी सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले गेले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा देखील केली होती. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना देखील घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. परंतु अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नव्हत्या.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत असत.
त्यावेळी जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या व बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली होती. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
महत्त्वाचं म्हणजे इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करत असत.
सावित्रीबाईंचा मृत्यू कसा झाला ?
सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी १८९७ मध्ये नालासोपारा परिसरात बुबोनिक प्लेगच्या जगभरातील तिसऱ्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले. क्लिनिकची स्थापना पुण्याच्या बाहेरील भागात, संसर्गमुक्त भागात करण्यात आली. पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला. गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. या प्रक्रियेत, सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता त्यांचा मृत्यू झाला. आणि सर्वत्र शोककळा पसरली.
सावित्रीबाईंच्या कविता आणि इतर लेखन
सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. त्यांनी १८५४ मध्ये काव्यफुले आणि १८९२ मध्ये बावनकाशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले आणि “जा, शिक्षण मिळवा” नावाची कविता देखील प्रकाशित केली, ज्यामध्ये त्यांनी वंचित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा परिणाम म्हणून त्या एक उत्कट स्त्रीवादी बनल्या. महिलांच्या हक्कांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. त्यांनी महिलांसाठी जातीय भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव मुक्त असलेल्या मेळाव्याचे ठिकाण देखील बोलावले. याचे प्रतिक म्हणजे उपस्थित सर्व महिलांनी एकाच चटईवर बसायचे. त्या भ्रूणहत्या विरोधी कार्यकर्त्यासुद्धा होत्या. सावित्री बाई यांनी महिलासांठी निवारास्थान उघडले होते, जेथे ब्राह्मण विधवा त्यांच्या मुलांची सुरक्षितपणे प्रसूती करू शकत होत्या आणि त्यांची इच्छा असल्यास त्यांना दत्तक घेण्यासाठी तेथे सोडू शकतात. त्यांनी बालविवाहाविरुद्धही मोहीम चालवली आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सतीप्रथेला कडाडून विरोध केला आणि त्यांनी विधवा आणि वंचित मुलांसाठी घर सुरू केले होते.
सावित्रीबाईंचा सत्कार
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके
- काव्यफुले (काव्यसंग्रह)
- सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
- सुबोध रत्नाकर
- बावनकशी
- जोतिबांची भाषणे (संपादक सावित्रीबाई फुले १८५६)
सावित्रीबाई यांचा विलोभनीय जीवनप्रवास खरचं प्रेरित करणारा आहे. त्या शिक्षणा संदर्भात असं म्हणतात,
“विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन”
FAQ
उत्तर: सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला.
उत्तर: इ.स १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह केव्हा झाला.
उत्तर: पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला होता.
उत्तर: १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली होती.
उत्तर: १० मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्यावेळी सर्वत्र शोककळा पसरली होती.
उत्तर: इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता.
लेखन आणि संकलन :
प्रिया गोमाशे