भिवंडी | आर्थिक सुबत्ता आल्यावर कोण काय खरेदी करेल सांगता येत नाही. भिवंडी तालुक्यातील वडपे गावातील शेतकऱ्यानं एक असाच निर्णय घेतला असून त्याच्या या निर्णयाची चर्चा साऱ्या पंचक्रोशीत सुरु झाली आहे. चक्क दुग्धव्यवसायासाठी हेलिकॉप्टर खरेदी करणार असल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलं आहे.
जनार्दन भोईर असं या शेतकऱ्याचं नाव आहे, ते उद्योजक देखील आहेत. भिवंडी तालुक्यात त्यांचा गोदामचा तसेच बांधकाम व्यवसाय आहे. याशिवाय त्यांनी दुग्ध व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवसायासाठी त्यांना नेहमी पंजाब, हरियाणा तसेच गुजरात, राजस्थानला जावे लागले. याच कारणामुळे हेलिकॉप्टरची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
भोईर यांनी खरेदी केलेलं हेलिकॉप्टर १५ मार्च रोजी त्यांना मिळणार आहे. त्यापूर्वी हेलिपॅडसह इतर गोष्टींची पाहणी करण्यासाठी मुंबईहून एक पथक वडपे गावात आलं होतं. यावेळी त्यांनी सर्व गोष्टींचा आढावा घेतला. यामध्ये हेलिपॅडसह संरक्षक भिंत, हेलिकॉप्टर ठेवण्याची जागा, गॅरेज तसेच पायलट, इंजिनिअर व सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र जागा यासंदर्भात व्यवस्था केली जाणार आहे.
दरम्यान, गावात हेलिकॉप्टर आल्यानं पाहण्यासाठी एकच गर्दी जमली होती. स्वतः भोईर यांनी हेलिकॉप्टरमध्ये न बसता ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना फेरफटका मारुन आणला. त्यामुळेही याचीही वेगळीच चर्चा गावात रंगली होती