सध्या सणांचा काळ सुरू आहे. त्यामुळे जिकडे तिकडे धूमधडाक्यात ऑनलाइन असो वा ऑफलाईन शॉपिंग सुरू आहे. आता त्यात ऑनलाइन शॉपिंग म्हटल्यास फ्लिपकार्ड आणि अमेझॉनसारख्या डझनभर कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन सेलचे आयोजन केले आहे. त्याचवेळी अनेक आकर्षक ऑफरही जाहीर होत आहेत. आकर्षक ऑफरच्या जोडीला ऑनलाईन सेलमुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंगचा ट्रेंड वाढला. विविध पेमेंट अॅप, इंटरनेट बँकिंग आणि डेबिड व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंग करणार्यांना कंपन्यांंकडून अगोदरच ऑफर दिली जात आहे. ऑफरमध्ये एखाद्या खास बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास दहा ते पंधरा टक्के सवलत किंवा एखाद्या कंपनीच्या डेबिट कार्डवर बोनस पॉईंट तसेच इंटरनेट बँकिंगने खरेदी केल्यास सवलत अशा अनेक ऑफर जाहिरातीत पाहावयास मिळतात. यात काही बँका देखील काही प्रमाणत खरेदी केलेल्या प्रॉडक्ट्सवर सवलत देत आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी ही जणू पर्वणीच आहे.
फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन किंवा अनेक ऑनलाइन शॉपिंग कंपन्या या ऑफरपेक्षा आणखी एक वेगळी ऑफर ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांसाठी देत आहेत. आणि ती म्हणजे ‘बाय नाऊ अँड पे लॅटर’. ‘बाय नाऊ अँड पे लॅटर’ म्हणजे आता खरेदी करा आणि पैसे नंतर भरा. होय. हीच ती सवलत आहे. एक रुपयाही न भरता खरेदी करण्याची मुभा या ऑफरच्या माध्यमातून ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली. या सुविधेंतर्गत ग्राहकांना पैसे भरण्यासाठी पंधरा ते ४५ दिवसांचा कालावधी मिळतो. पैसे भरण्याच्या तारखेला ती रक्कम डेबिट, क्रेडिट कार्ड, पेमेंट अॅप किंवा बँक खात्यातून आपोआप काढून घेतली जाईल. या सुविधेत ईएमआयचा पर्यायदेखील आहे. यानुसार तीन, सहा आणि १२ हप्त्यांत देखील पैसे भरू शकतात. निश्चित तारखेला खात्यात पैसे नसतील, तर पेनल्टीबरोबरच होणार्या विलंबामुळे सिबिल स्कोअरवरदेखील परिणाम होऊ शकतो. मात्र या गोष्टीची काळजी ग्राहकाने घेणे गरजेचे आहे.
खरेदी करताय ? मग कागदपत्रे द्या !
आनंदाची बातमी म्हणजे, ऑनलाईन शॉपिंग करणार्या सर्व ग्राहकांसाठी ‘बाय नाऊ अँड पे लॅटर’ ही सुविधा आता उपलब्ध आहे. यासाठीची एक अट पूर्ण करावी लागेल आणि ती म्हणजे संबंधित संकेतस्थळावर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. केवायसीसाठी आधार, पॅन आणि व्होटर आयडी डिजिटल कॉपी आवश्यक असते. केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतो आणि निश्चित तारखेच्या आतही खात्यातून पैसे भरू शकतो. अर्थात, या योजना ठरावीक प्रॉडक्टवर उपलब्ध होतात. यात गॅझेटची खरेदी, फूड प्रॉडक्ट, प्रवासाचे आरक्षण, गॅस बुकिंग, बिलाचा भरणा तसेच ऑनलाईनवर धान्य खरेदी केल्यानंतरही यासारखे ऑफर मिळतात. याचा अर्थ असा की तुम्ही जर जास्त प्रमाणात खरेदी करत असाल तेव्हा साहजिकच जास्त बिल आकारण्यात येतोच. परंतु आता हा बिल तुम्हाला आधीच प्रॉडक्ट्स घेऊन काही काळात पेड करावा लागेल.
बिल भरणा कोण करेल ?
शॉपिंग केल्यावर आता पैसे ऑनलाइन शॉपिंग कंपनीवाल्यांना पेड कसे करता येईल हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. खरंतर ही योजना एखादे झटपट कर्ज मिळविण्यासारखी आहे. यात ग्राहकांकडून खरेदी केलेल्या वस्तूंचा बिल भरणा हा आर्थिक सेवा देणार्या कंपन्यांकडून तत्काळ केला जातो. यासाठी ई-कॉमर्स कंपन्या आणि विक्रेता यात करार असतो. या करारानुसार ग्राहकाने शॉपिंग केल्यानंतर ई-कॉमर्स कंपनी ही आपल्या प्लॅटफॉर्मवर उत्पादन विक्री करणार्या विक्रेत्याला वित्तीय सेवाद्वारे तत्काळ पैसे देते. हे पैसे कसे मिळतील ? तर, ग्राहकांकडून ई-कॉमर्सला पैसे मिळतात, तेव्हा ते पैसे आर्थिक सेवा देणार्या कंपन्यांना स्थानांतरित केले जातात. अनेक बाबतीत ग्राहक थेटपणे आर्थिक सेवा देणार्या कंपन्यांकडे बिल भरणा करतात. त्यामुळे ग्राहकांना शॉपिंग करतांना सध्या टेन्शन न याचा लाभ घेता येईल.
कशी खरेदी कराल ?
जर ऑनलाईन शॉपिंग करायसाठी पैसे नसतील. पण एखादा प्रॉडक्ट खूप आवडलाय किंवा खरेदी करायचंय तर अशावेळेस ‘बाय नाऊ अँड पे लॅटर’ ही सुविधा क्रेडिट कार्डप्रमाणेच तुम्हाला मदत करू शकेल. कारण, क्रेडिट कार्डवरदेखील ग्राहकाला पंचेचाळीस दिवसांपर्यंत पैसे भरण्यासाठी वेळ मिळतो. दोन्ही सुविधांमध्ये ठरलेल्या तारखेपर्यंत ग्राहकांकडून कोणतेही व्याज आकारले जात नाही. परंतु, निश्चित तारखेला बिल न भरल्यास कंपनीकडून आकारले जाणारे व्याज सरासरीपेक्षा अधिक असते. क्रेडिट कार्डचा वापर हा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आणि बिल भरण्यासाठी केला जातो; मात्र ही योजना केवळ ऑनलाईन खरेदीसाठी लागू असते. दुसरीकडे क्रेडिट कार्डवर शॉपिंग केल्यास काही छुपे शुल्क आदीदेखील कंपन्यांकडून वसूल केले जातात; पण ‘बाय नाऊ पे लॅटर’ या पर्यायानुसार कोणतेही शुल्क लागू होत नाही. एखादा व्यक्ती ‘बाय नाऊ’चा पर्याय निवडत असेल, तर त्याला यासाठी केवायसीशिवाय अन्य कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही. त्याचवेळी क्रेडिट कार्ड तयार करणे हे कठीण काम आहे. कारण, कंपन्यांकडून बर्याच औपचारिकता पार पाडल्या जातात. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करतांना तुम्ही कोणता पर्याय निवडाल हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे.
खरेदीचे नियम आणि जाणीवजागृती
‘बाय नाऊ, पे लॅटर’ सारखी योजना ही कोणत्याही बँकेच्या पर्सनल लोनपेक्षा चांगली वाटू लागते. पर्सनल लोन घेतल्यानंतर त्यावर तत्काळ व्याज आकारले जाते; मात्र या योजनेत दीड महिन्यापर्यंत कोणतेही व्याज आकारले जात नाही. अर्थात, पर्सनल लोन घेतल्यानंतर कर्जदार व्यक्ती ती रक्कम कोठेही वापरू शकते. ‘बाय नाऊ’ सुविधा ही निश्चित प्लॅटफॉर्मवर आणि वस्तूंच्या खरेदीवरच उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही जर या ऑप्शनचा वापर करत असाल आणि ते तुमच्यासाठी जर सोईस्कर जात असेल तर नक्कीच तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. परंतु परदेशी कंपन्यांकडून आपल्याला हवे असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करून जर का आपण आपले भारतीय चलन दुसऱ्या देशात शॉपिंगद्वारे पाठवत असू तर हा आपल्या देशाचा अर्थिक लॉस असेल. जर तुम्ही ऑफलाईन खरेदी करत असाल तर नक्कीच आपल्या भारतीय वस्तू खरेदी करा किंवा गोरगरीब कुटुंबाकडून वस्तू विकत घ्या. म्हणजे भारतीय चलन भारतातच राहण्यास मदत होईल.