पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’यांचे मंगळवारी ३० मे २०२२ रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले.‘वॉईस ऑफ लव्ह’ अशी ओळख असणारे कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’यांच्या मृत्यूमुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अभी अभी.. तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…, हम रहे या ना रहे कल…, यासारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.
या प्रकरणामध्ये आता कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. ‘केके’ लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गाणी गात होता. मात्र त्यानंतर अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली. केकेच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणाही आढळल्या आहेत. ‘केके’च्या मृत्यूनंतर अनेक दावे केले जात आहे.
‘केके’च्या शवविच्छेदन अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार ‘केके’चा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, ‘केके’चा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला तरी त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसांची स्थिती फारशी चांगली नव्हती असे या अहवालात नमूद केले आहे.‘केके’ याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत झाला होता. ‘केके’ यांनी हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली होती.