केंद्रीय अर्थमंत्रालयाने गुरूवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यापेक्षा कर संकलन ३.९ टक्क्यांनी घटले असून महाराष्ट्रातील कर संकलन सहा टक्क्यांनी म्हणजेच, सुमारे दीड हजार कोटी कमी झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात देशात १.४५ लाख कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर जमा झाला आहे.
ऑक्टोबर महिन्यात सणासुदीचे दिवस असल्यामुळे जीएसटी संकलन तब्बल १.५२ लाख कोटींच्या घरात गेले होते. त्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये महिन्यात १,४५,८६७ कोटींचे महसुली उत्पन्न मिळाले असताना नोव्हेंबर २०२१च्या तुलनेत मात्र १०.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२१मध्ये १.३२ लाख कोटी कर संकलित झाला होता. चालू वर्षांत मार्च महिन्यापासून जीएसटी संकलन हे निरंतर १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. नोव्हेंबरमधील जीएसटी महसुलामध्ये केंद्रीय जीएसटीपोटी रक्कम २५,६८१ कोटी रुपये, राज्य जीएसटी म्हणून ३२,६५१ कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटीपोटी ७७,१०३ कोटी रुपये (आयात वस्तूंवर मिळालेल्या ३८,६३५ कोटी रुपयांसह) आले आहेत, तर उपकर संकलनाची रक्कम १०,४३३ कोटी (आयातीवर मिळालेल्या ८१७ कोटी रुपयांसह) रुपयांचा वाटा असल्याचे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये २३ हजार कोटींपेक्षा अधिक कर जमा झाला होता. नोव्हेंबमध्ये त्यात सुमारे दीड हजार कोटींची घट होऊन २१,६११ कोटींचे कर संकलन झाले आहे.
ऑक्टोबरमध्ये सणांमुळे संकलन वाढले होते, मात्र राज्याची सरासरी ही २१ हजार कोटींच्या आसपास असल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. देशात संकलनात महाराष्ट्र सर्वाधिक आघाडीवरील राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकपेक्षा (१०,२३८ कोटी) महाराष्ट्राचे संकलन दुप्पट असल्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. देशांतर्गत आर्थिक विकास दर कमी झाल्याचे परिणाम राज्यातही उमटल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर किंचितसा परीणाम झाला आहे.
-किती महसूल प्राप्त झाले ?
चालू आर्थिक वर्षांत दोनदा एकूण संकलन दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. एप्रिल २०२२ मध्ये एकूण १.६७ लाख कोटी रुपयांचे तर ऑक्टोबरमध्ये १.५२ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. चालू २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून ११.८८ लाख कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
-महाराष्ट्रात सहा टक्क्यांची घट
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात २१,६११ कोटींचे कर संकलन झाले आहे. गेल्या महिन्यात राज्यात जीएसटीमधून २३ हजार कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला होता. त्या तुलनेत सुमारे दीड हजार कोटी, म्हणजे सहा टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर किंचितसा परीणाम झालेला दिसेल.