सध्या महागाईचा जमाना आहे. गॅस सिलेंडरच्या किंमती वाढत असल्यामुळे दारिद्र्य रेषेखालील किंवा सामान्य वर्गातील कुटुंबाला ते परवडण्याजोगे नाही. त्यामुळे गॅस सिलेंडरची बचत केल्यास तो आणखी चार दिवस टिकेल यासाठी आपण प्रयत्न केले तर आपलाच फायदा होईल. खरंतर महिनोमहिने सुरू असलेले गॅस सिलेंडरही सण सुरू होताच १२-१५ दिवसांत संपतात. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती आणि ग्रामीण क्षेत्रात काही भागांत चालणारे हे गॅस सिलेंडर फार काळ कसे टिकेल ? गॅसचा योग्य उपयोग कसा करायचा हे कर माहीत असेल तर नक्कीच तुमच्या गॅस सिलेंडरची बचत होईल, आणि वेळेच्या आधी तो संपणार देखील नाही. त्याचबरोबर शहरी भागांत ज्या घरांमध्ये गॅस पाईपलाईन आहेत, त्यांच्या घरात गॅसचे लांबलचक बिल येते. त्यामुळे त्याचा योग्य वापर केला पाहिजे. अशावेळी स्वयंपाक करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या की गॅस सिलेंडरसोबत आपला खर्च देखील वाचेल. जर तुम्हालादेखील गॅसची बचत करायची असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. मग चला तर बघुयात सोप्या आणि घरगुती टिप्स.
गॅस वाचवण्यासाठी सोप्या टीप्स
१) प्रेशर कुकिंग –
पारंपारिक स्वयंपाक पद्धतींच्या तुलनेत प्रेशर कुकिंगमुळे गॅसची बचत होते. विशेषतः वरण, भात बनवताना. याशिवाय वेळेची बचत होण्यासही मदत होते.
२) पाण्याचे प्रमाण –
पाण्याचे कमी प्रमाण इंधनाची बचत करते. जर तुम्ही भरपूर पाणी वापरत असाल तर ते सुकवण्यासाठी जास्त गॅसची गरज आहे.
३) बनवण्यापूर्वी काही वेळ भिजत ठेवा –
काही खाद्यपदार्थ भिजवल्यास गॅसची बचत होईल. उदाहरणार्थ, चणे, राजमा यासारख्या गोष्टी रात्रभर भिजवून ठेवल्याने इंधनाचा वापर कमी होतो.
४) झाकण वापरा –
स्वयंपाकाची भांडी झाकणाने झाकणे ही चांगली पद्धत आहे. असे केल्याने अन्न लवकर शिजते आणि इंधनाची अधिक बचत होते.
५) बर्नर साफ करा –
तुमचा गॅस रेंज बर्नर नियमितपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. घाणीने भरलेले गॅस बर्नर इंधनाचा वापर वाढवतात. तुमच्या स्टोव्हची नियमित देखभाल केल्याने तुम्हाला इंधनाची बचत होण्यास मदत होते.
६) लो फ्लेम –
जेव्हा लिक्विड उकळायला लागतो तेव्हा तुमचा स्टोव्ह मंद आचेवर ठेवा, कारण ते उकळण्यासाठी पुरेसे आहे. अशा प्रकारे गॅसचा अपव्यय कमी होईल.
७) प्रथम तयारी करा –
स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व साहित्य तयार करून जवळ ठेवा. मग भांडे गॅसवर ठेवा आणि स्वयंपाक सुरू करा.