ओणम सण हा शब्द कित्येकदा आपल्या कानावर पडला असावा. पण तुम्हाला माहिती आहे का या दिवसाचे महत्व काय असते ? आणि मुख्य कोणत्या जमातीतील लोकं हा सण साजरा करतात ? पण या सणाला आहे वैज्ञानिकदृष्या महत्व. ते कसे हे आज आपण आजच्या खास लेखातून जाणुन घेणार आहोत.
What is Onam Festival | ओणम सण काय आहे
केरळमध्ये धूमधडाक्यात साजरा होणारा खास मल्याळी लोकांचा सण म्हणजे ‘ओणम’ ! ओणम म्हटल्यावर आठवतात त्या या दिवसांत केरळमध्ये ठिकठिकाणच्या नद्या व तळ्यांमध्ये होणाऱ्या बोटींच्या शर्यती! ओणम हा कापणीच्या हंगामातील सण. पावसाळा संपत आलेला असतो. बहरलेल्या हिरवाइच्या रूपात निसर्गदेवता ओणमचे स्वागत करायला सज्ज झालेली असते. फुलांची रांगोळी हेही या सणाचे एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते. वर फुलांची रांगोळी काढण्यात मुलेमुली गढून जातात. घराच्या आजूबाजूला सकाळी लवकर फिरून पुक्काळम्साठी विविध रंगांची फुलं गोळा करण्याचा त्यांचा उत्साह दांडगा असतो.
Importance of Onam Festival | ओणम सणाचे महत्व काय
दिवसांचे महत्वविशेष
पहिल्या दिवशी काढलेल्या फुलांच्या रांगोळीत रोज थोडी थोडी फुलांची भर पडत जाते. दहाव्या दिवशी या फुलांच्या रांगोळीचा भलामोठा आकार बघण्यासारखा असतो. विष्णूच्या वामन अवताराच्या आणि बळीराजाच्या कल्पित आगमनाप्रीत्यर्थ हा सण मल्याळी लोकांत उत्साहाने साजरा केला जातो. मल्याळी कॅलेंडरमधील चिङ्ग्यम महिन्यातील पहिल्या दिवसापासून दहा दिवस चालणारा हा आनंदोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. हा सण दहा दिवसांचा असला तरी त्यातील पहिल्या दिवसाला महत्त्व असते. या सणाचा पहिला दिवस गणेश चतुर्थीपासून सुरू होतो. त्याला ‘अत्तम’ म्हणतात. पहिल्या दिवशी केरळमधल्या गावागावांतून या सणाचा म्हणून ध्वज उभारला जातो. हा ध्वज मग ते अॅलेप्पी जिल्ह्याच्या एडत्वा गावातील चर्च असो वा चेरामन येथील भारतातील आद्य मशीद असो- सर्वत्र असतो. ध्वज उभारण्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा केरळमधील सर्व मंदिरांत सारखीच असते.
कोचीनजवळील त्रिक्काक्करा या गावातील मंदिर संकुलात वामनाचे मुख्य मंदिर आहे. या संकुलात विष्णूचीही मंदिरं भरपूर आहेत. सणाच्या पहिल्या दिवशी वामनाची मूर्ती अग्रभागी ठेवून मोठी मिरवणूक काढली जाते. सायंकाळी मंदिराला चोहोबाजूने वेढलेल्या चट्टविळकमध्ये पणत्या लावल्या जातात. या देवळांत ओणसद्या मोठय़ा प्रमाणावर दिली जाते.
साफसफाईला महत्व
उत्सवाच्या दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच कथकलीसारखे करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. या सणाची मल्याळी लोकांना एवढी उत्सुकता असते, की अगोदरच्या महिन्यापासूनच म्हणजे मल्याळी कर्केटम महिन्यापासून घरातील साफसफाईला सुरुवात होते. उद वगरे जाळून घरातील किडय़ामुंग्यांना घालवले जाते. जुनाट टाकाऊ वस्तू बांबूच्या परातीत घालून त्यांना घरातील इडा-पीडा समजून नोकराकरवी त्या दूरवर फेकल्या जातात. त्या नोकराकरवी घराबाहेर काढताना वाटेत घरातील कोणी नोकराला आडवे जाणार नाही याची दक्षता घेतली जाते.
केळींच्या पदार्थांचा बेत
दहाव्या दिवशी म्हणजे तिरूओणमच्या दिवशी लवकर उठून स्नान केल्यावर नवे कपडे घालून देवदर्शन करण्याची लोकांमध्ये लगबग असते. या सणाचे मुख्य आकर्षण असते मेजवानी. नाश्त्याला केरळमध्ये खास मिळणारी केळी उकडून खायला दिली जातात. त्याबरोबरच पिकलेल्या केळ्यांसह पापडम्चा खासा फराळ असतो. जेवणातील मुख्य पदार्थाबरोबर हेही पदार्थ वाढले जातात. या दिवसांत कोणाही मल्याळी माणसाच्या घरात पाहुणे म्हणून जा- कुरकुरीत खाऱ्या केळ्याच्या चिप्सबरोबर कॉफीच्या कपाने तुमचे मनापासून स्वागत होईल.
पारंपरिक पद्धतीने मूर्तिपूजा
पूर्वीच्या काळी गावांत काही ठिकाणी झाडावर झोपाळे बांधले जात. हे झुले सुंदर फुलांनी सजवले जात. नाटकं, संगीत, जलसे यांचा या दिवसांत नुसता जल्लोष असतो. ओणमला चिकणमातीपासून अंडाकृती आकाराच्या विष्णूच्या मूर्ती बनवल्या जातात. तांदळाच्या पिठीचा वापर करून त्यावर नक्षी काढली जाते. माडाच्या काडय़ा या मूर्तीना टोचून त्यावर सुरेख फुलं खोचली जातात. अशा सजवलेल्या मूर्ती अंगणात, फुलांच्या रांगोळीच्या मधे ठेवल्या जातात. त्या दिवशी या देवाला तीन वेळा नवेद्य दाखवला जातो.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
ओणम हा सण १९६० पासून केरळ सरकार राज्यपातळीवर साजरा करू लागले आहे. या महिन्यात हा ‘पर्यटन सप्ताह’ आखला जातो. संपूर्ण राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. यानिमित्त विविध क्रीडाप्रकारांचे आयोजन केले जाते. ज्यात धाडसाची गरज असते असे पुरुषांचे खेळ- म्हणजे तळप्पंतू कळी (बलापाठोपाठ त्याचा कासरा धरून वेगाने धावणे), वळ्ळम्कळी (सरोवरे आणि नदीपात्रातील बोटींच्या शर्यती), पुलीकळी (वाघाच्या सोंगांचा खेळ) हे खेळ खेळले जातात. तर महिला कईकोट्टी कळी आणि तुंबी तुल्लाल (एक-दुसरीला टाळ्या देत फेर धरून केले जाणारे नृत्य) खेळतात.
दहाव्या दिवशी मंदिर आवारातील ओणमचा ध्वज उतरवण्यात येतो. ध्वज उतरवण्याचा पहिला मान कोचीपासून १२ कि.मी.वरील त्रिपुण्णित्तुरा येथील देवळाला जातो. त्रिपुण्णितुरा ही पूर्वी केरळची राजधानी होती. येथील मंदिरातील ध्वज खाली आणल्यावरच सर्व ठिकाणचे ध्वज खाली आणले जातात.
या सणाच्या दिवसांत केरळमधील स्त्रिया पारंपरिक वस्त्रांत वावरतात. ओणम हा एकमेकांना भेटवस्तू देण्याचा व घेण्याचा सण समजला जातो. घरातील कुटुंबप्रमुख कुटुंबातील प्रत्येकाला त्या दिवशी नवीन कपडे- ज्याला ओणपुडावा म्हणतात- भेट देतो. घरातल्यांना या भेटी दिल्यावर मग घरातील नोकर व शेतातील मजुरांनाही भेटवस्तू देतात. असे केल्याने अश्या देवाण-घेवाणातून नातं अगदी घट्ट होत असते हे या सणाचे खास वैशिष्टय आहे हे यावरून कळते.