व्हिटॅमिन सीचा महत्त्वाचा स्त्रोत असल्याने लिंबाला आहारात बरेच महत्त्व आहे. त्यामुळेच नियमित लिंबू खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडूनही दिला जातो. कॅलरी बर्न होण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचा उपाय अनेक जण करतात. इतकेच नाही तर हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर लिंबू अतिशय फायदेशीर ठरते (How to Store Lemons in Right Way). हिवाळ्याच्या दिवसांत या गोष्टींची असणारी मुबलक आवक उन्हाळ्यात कमी होत असल्याने किमती झपाट्याने वाढतात.
उन्हाळ्यात सरबतासाठी लागणारे लिंबू आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. सॅलेडवर, कोशिंबीरीत, पोहे आणि खमंग उपीट यांवर आपण आवर्जून लिंबू पिळून घेतो. लिंबू बाहेर ठेवले तर उन्हाच्या तडाख्यामुळे ते लगेच वाळून जाण्याची शक्यता असते.लिंबू फ्रिजमध्येही वाळून जातात आणि कडक होतात. अशावेळी पैसे तर वाया जातातच पण लिंबूही वाया जाते. आता लिंबला जणू सोन्याचा भाव मिळतो की काय असे झाले आहे. चला तर मग लिंबू साठवून ठेवण्याची योग्य पद्धत मराठी Shout तुम्हाला सांगत आहे….
महिनाभर किंवा अधिक काळ लिंबू हवा ताजा मग हे करा:
- आपण जास्तीची लिंबं आणली असतील आणि ती खराब होऊ नये म्हणून जास्त दिवसांसाठी साठवून ठेवायची असतील तर आणखी एक सोपा उपाय आहे. एक प्लास्टीकची हवाबंद पिशवी घेऊन त्यात सगळी लिंबं भरायची. या पिशवीला एक बारीक छेद द्यायचा आणि ही पिशवी फ्रिजरमध्ये ठेवून द्यायची. पिशवीला छेद दिल्याने त्यातील हवा थोडी खेळती राहण्यास मदत होते. मात्र वापरण्याच्या वेळी ही लिंबं थोडी आधीच बाहेर काढून सामान्य तापमानाला येऊ द्यायची.
- एका भांड्यात पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये लिंबू पूर्ण बुडेल असे ठेवायचे. पाण्यामुळे लिंबू जास्त काळ ताजेतवाने राहायला मदत होते. यामुळे लिंबाचा रसदारपणा आहे तसाच टिकून राहतो. यासाठी हवाबंद डब्यात पाणी घालायचे आणि त्यामध्ये लिंबं पूर्ण बुडतील अशापद्धतीने घालून मग ते फ्रिजमध्ये ठेवायचे. ही लिंबं तुम्ही तीन ते चार आठवड्यांनी बाहेर काढली तरी आहेत तशीच राहीलेली दिसतील. यासाठी शक्यतो काचेचा किंवा प्लास्टीकचा डबा घ्यावा.