दसरा किंवा विजयादशमी हा हिंदूंच्या मुख्य सणांपैकी एक आहे जो संपूर्ण भारतभरात वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून साजरा केला जातो. नेपाळ आणि बांगलादेशसह इतर देशांमध्येही हा सण अनोख्या विधी, परंपरा आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी रामाने विजय मिळाल्यामुळे हा दिवस त्याकाळी दीपोत्सव सणासारखा साजरा केला गेला. परंतु आत्ताच्या आधुनिक काळात युवावर्ग हा फटाके उडवून, आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात. परंतु अनेकांना या दासऱ्या सणाचे महत्व माहिती नसते. त्यामागील पौराणिक कथा काय सांगून जाते ? त्या दिवशी आपट्याची पाने का वाटली जातात ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या खास सणाचा मुहूर्त आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. मग चला तर सुरूवात करूयात पवित्र मुहूर्तापासून.
विजयादशमी २०२२ मुहूर्त
– अश्विन शुद्ध दशमी प्रारंभ : मंगळवार, ४ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ०२ वाजून २० मिनिटे.
– अश्विन शुद्ध दशमी समाप्ती : बुधवार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी १२ वाजता.
– विजय मुहूर्त : बुधवार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ०२ वाजून २६ मिनिटे ते दुपारी ०३ वाजून १३ मिनिटे.
विजयादशमी तिथी
पंचांगानुसार, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. वैदिक पंचांगानुसार, या वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.२१ पासून सुरू होईल आणि दुसर्या दिवशी म्हणजे बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत राहील. त्यामुळे उदय तिथीला आधार मानून दसरा केवळ ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. त्यामुळे रावणदहन ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सूर्यास्तानंतर करावे. म्हणूनच आपल्याकडे दसरा किंवा विजयादशमीचा सण हा बुधवार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा करावा. मात्र, नवरात्रानंतर करण्यात येणारे दुर्गा देवी विसर्जन ६ ऑक्टोबर रोजी करावे, असे सांगितले जाते.
दसरा, विजयादशमीचे महत्त्व
विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीचे पूजन करावयाचे. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीचे पूजन करायचे, अशी प्रथा प्रचलित आहे. प्रारंभी हा एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई. त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतही प्रचलित आहे.
पौराणिक कथेनुसार..
राक्षस राजा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा प्रभू रामाने आपल्या पत्नीला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याच्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. भगवान हनुमान आणि त्यांच्या वानर सेनेच्या मदतीने, भगवान राम आणि भगवान लक्ष्मण लंकेत पोहोचले आणि रावणाने स्थापन केलेल्या राक्षसांच्या प्रचंड सैन्याशी लढले. रावणाचा भाऊ कुंभकरण आणि त्याचा मुलगा मेघनाथ हे देखील युद्धाच्या वेळी लढायला आले आणि शेवटी मारले गेले. खडतर लढा दिल्यानंतर अश्वनी मास शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध केला. हा दिवस विजयादशमी म्हणून संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतींनी दसरा सण म्हणून साजरा केला जातो.
शमीचं महत्त्वं
पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले, अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात.