आज बहुतांश लोकांकडे True caller ॲप आहे. अनोळख्या, अनसेव्ह कॉन्टॅक्टचे कॉल्स येताच त्यांचे नाव आपल्या मोबाईलवर दिसते. खरंतर, आपण कितीही कामात असलो, कितीही बिझी असलो तरी आपण फोन आला तर आधी नेमका तो फोन कुणाचा आहे हे वेळ काढून बघतो. नंबर सेव्ह असेल तरच तो फोन उचलतो, नसेल तर आपण फोन उचलत नाही. सगळेच असं करतात असं नाही पण आपल्यातले बहुतांश लोक हेच करतात. का ? फसवणूक ! सुरक्षेच्या कारणास्तव आपण ही खबरदारी घेतो. आता मात्र सगळ्यांसाठीच एक खुशखबर आहे. आपल्याला फोन आला की तो फोन कुणाचाही असो, आपल्याला त्या व्यक्तीचं नाव दिसणार आहे. चला तर मग याबाबत जरा सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
खरंतर, ही आनंदाची बातमी म्हणजे, आपली भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच अशा उपाययोजना सुरू करणार आहे, ज्यामुळे कॉल/रिंगिंग होत असताना रिसीव्हरच्या फोन स्क्रीनवर कॉलरचे नाव दिसणार आहे. कॉलरने सादर केलेल्या Know Your Customers (KYC) डेटाच्या आधारे हे नाव जोडले जाणारे. असे फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या अहवालात म्हटले आहे.भारताच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे लोकांना खूप दिलासा मिळणार आहे. लोकांची चेष्टा करण्यासाठी केला जाणारा फोन, घोटाळा, फसवणूक यासाठी केल्या जाणाऱ्या फोन कॉल्सला आता चांगलाच चाप बसणार आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी सोयीस्कर अशी ही सेवा मिळणार आहे.
अज्ञात कॉल आला आणि आपण जर तो रिसीव केला किंवा त्या कॉलमध्ये सांगितलेले डिटेल्स जर आपण फॉलो केलेत की आपल्या अकाउंटमधील पैसे जाण्याची देखील शक्यता असते परंतु आता ही समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. खरंतर, ‘ट्राय’च्या या निर्णयामुळे सर्व फोन घोटाळे मिटतीलच असे नाही तर त्यामुळे लोकांचा संपर्कसुद्धा मर्यादित होणार आहे. एकदा का ही कारवाई अंमलात आणली गेली की, कॉल रिसीव्हरला त्याच्या/तिच्या फोनवर कॉलरचे नाव सेव्ह केले गेले नसले तरी, टेलिकॉम ऑपरेटरला सादर केलेल्या नंतरच्या केवायसी रेकॉर्डनुसार कॉलरचे नाव पाहता येणारे. कॉलर आयडेंटिटी या नवीन फीचरवर ट्राय काम करत आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नावदेखील मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे. हे नाव केवायसीनुसार असेल. ज्या व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड असेल त्याचं नाव स्क्रीनवर दिसणार आहे.
यासंबंधीचा नियम लागू झाल्यानंतर युझर्सला अशा कॉलरचं नावदेखील स्क्रीनवर दिसेल, ज्याचा मोबाइल क्रमांक फोनमध्ये सेव्ह नसेल. यासाठी कोणतंही वेगळं अॅप डाउनलोड करावं लागणार नाही. ट्राय हे फीचर येत्या तीन आठवड्यांत रिलीज करू शकतं. आतापर्यंत, Truecaller सारखे अॅप आपल्याला अशा पद्धतीची माहिती प्रदान करत असे. Truecaller ने गोळा केलेला डेटा क्राउडसोर्सिंगवर आधारित असल्याने त्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. पण केवायसी बेस्ड सिस्टीमवर आपण विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे “हा नंबर नेमका कुणाचा” यासाठी आता आपल्याला थर्ड पार्टी अॅपवर विसंबून राहावं लागणार नाही. ट्रायच्या पुढाकारामुळे हे शक्य होणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील या तंत्रज्ञानाचा लवकरात लवकर वापर करू शकाल. ही माहिती आवडल्यास इतरांपर्यंत देखील पोहचवा.